![]()
पुणे शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या ‘सेगमेंट कास्टिंग’च्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग दक्षिण पुण्याला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गिकेचे काम सुरू झाल्याने भविष्यात सातारा रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. पहिल्या सेगमेंटचे काम सुरू झाल्यामुळे पुणे मेट्रोच्या पुढील प्रवासाला वेग आला आहे. लवकरच पुणेकरांना या मार्गावरूनही सुखकर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. यावेळी श्रावण हर्डीकर यांनी कास्टिंग यार्डमध्ये सुरू असलेल्या कामाची बारकाईने पाहणी केली. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि उपस्थित अभियंता तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक माहिती जाणून घेतली. प्रवाशांच्या सोयीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने, काम वेळेत आणि उच्च दर्जाचे व्हावे यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचनाही दिल्या. यावेळी महामेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल (प्रणाली व संचालन), हरेंद्र पांडे (वित्त) आणि अतुल गाडगीळ (कार्य) यांच्यासह पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या ‘सीईएम इंडिया’ कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान यापूर्वी भुयारी मार्ग झाला असून त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील प्रवाशांचा मिळत आहे. संबंधित भुयारी प्रकल्प होत असतानाच स्वारगेट ते कात्रज यादरम्यान देखील मेट्रो भुयारी मार्ग व्हावा या दृष्टीने नागरिकांकडून मागणी होत होती. आता या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने नागरिकांच्या मागणीला यश आले असल्याचे दिसून येत आहे.
Source link
पुण्यात स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात:पहिल्या 'सेगमेंट कास्टिंग'चे उद्घाटन, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत