![]()
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या तीन ट्रकची अन्न व औषध प्रशासनाच्या तीन जिल्हयातील पथकाने छापा टाकून तपासणी केली. यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेली २.३४ कोटी रुपये किंमतीची १२६५ पोते सुपारी पकडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुध्द मंगळवारी ता. ९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून वारंगाफाटा मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या ट्रममधून किड लागलेली तसेच रंगमिश्रीत सुपारी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून परभणी, हिंगोली, नांदेड येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ता. ८ रात्री वारंगाफाटा येथे येऊन तीन ट्रकची तपासणी केली. यामध्ये तीन ट्रकमध्ये तब्बल १२६५ पोती सुपारी आढळून आली. सदर सुपारी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून आले. या शिवाय अधिकाऱ्यांनी बिलाची तपासणी केली असता त्यामध्ये जीएसटी बिला ऐवजी कच्ची बिले वापरून कर बुडविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ट्रक क्रमांक एमएच ४० बीएफ ९९१८ यातून ७६ लाख रुपये किंमतीची ४१५ पोती सुपारी जप्त केली. ट्रक क्रमांक एमएच ४० बीएफ ९९०९ मधून ७७ लाख रुपये किंमतीची ४२० पोती सुपारी तर ट्रक क्रमांक केए ७० – ४२०५ यातून ७९ लाख रुपये किंमतीची ४३० पोती सुपारी अशी एकूण २.३४ कोटी रुपये किंमतीची सुपारी जप्त केली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी ट्रक चालक बाबा शिंदे, अशोक शिंदे (दोघे रा. जातेगाव, जि. सोलापूर), सुरेश शिंदे (रा.गिरवली, जि.अहिल्यानगर) यांच्यासह श्री शिवा ट्रेडर्स व रामसी ट्रेडर्स (शिवमोग्गा), गणपती प्रोडक्ट्स (छत्तीसगड), डिलाईट ट्रेडर्स (दिल्ली), श्री श्रीधर ट्रान्सपोर्टचे मालक अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद मरे पुढील तपास करीत आहेत. तीन चालकांची चौकशी सुरु या प्रकरणात पोलिसांनी तीनही ट्रक चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरील सुपारी हैदराबाद कडे नेली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुटखा व इतर सुगंधित सुपारी तयार करणाऱ्या कारखान्यांना या सुपारीचा पुरवठा होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Source link
कळमनुरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई:तीन ट्रकमधून 2.34 कोटींची 1265 पोती सुपारी जप्त; 8 जणांवर गुन्हे दाखल