Headlines

विधान परिषद निवडणूक:मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांची गोवा वारी, संपूर्ण 'टूर प्लॅन' समोर; काँग्रेसच्या दाव्याने वाढली धाकधूक?




विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत भाजपची मते फुटू नयेत (क्रॉसव्होटिंग रोखण्यासाठी) आणि पक्षाचे सर्व नगरसेवक एकसंघ राहावेत, यासाठी भाजपने तगडी तटबंदी उभारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप नागपूर महानगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना तब्बल तीन दिवस गोव्याला नेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. नागपूरच्या स्थानिक राजकीय रणधुमाळी आणि दबावापासून दूर ठेवण्यासाठी या सर्व नगरसेवकांचा ‘टूर प्लॅन’ देखील निश्चित करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढत कमालीची चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात ही थेट लढत होत आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपचे स्पष्ट संख्याबळ असले, तरी काँग्रेस नेत्यांनी ‘क्रॉसव्होटिंग’ (मते फुटणार) होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. काँग्रेसचा हा दावा खोडून काढण्यासाठी आणि आपले संख्याबळ एकसंघ ठेवण्यासाठी भाजपने ‘मिशन नागपूर’ अंतर्गत सर्व नगरसेवकांना नागपूरबाहेर नेण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. असा असेल नगरसेवकांचा संपूर्ण ‘टूर प्लॅन’ मिळालेल्या माहितीनुसार, १० जूनपासून ते थेट मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ जूनपर्यंत नगरसेवकांना नागपूरबाहेर ठेवले जाणार आहे. नगरसेवकांना मुंबईतील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे नेण्यामागे पक्ष संघटन, प्रशासन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाच्या अवघे काही दिवस आधी आयोजित केलेला हा अभ्यासवर्ग आणि त्यानंतरचा गोवा दौरा यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण सहलीसाठी सर्व नगरसेवकांकडून काही प्रमाणात ‘सहकार्य रक्कम’ (वर्गणी) देखील गोळा करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या दाव्याने वाढली धाकधूक नागपूर पालिका क्षेत्रात भाजपचे वर्चस्व असले, तरी कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे एकही मत फुटू नये आणि भाजपचे संख्याबळ भक्कम दिसावे, यासाठी पक्षश्रेष्ठींनी ही विशेष पावले उचलली आहेत. १७ जूनला नागपुरात परत येईपर्यंत हे सर्व नगरसेवक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या थेट देखरेखीखाली असणार आहेत. आता भाजपची ही ‘कौन्सिलिंग’ आणि ‘गोवा वारी’ काँग्रेसच्या दाव्याला खिळ घालण्यात किती यशस्वी ठरते? हे १८ जूनच्या मतदानानंतरच स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *