Headlines

काटशेवरी, धानोरा फाट्यावर रास्ता रोको‎:करमाड येथे कडकडीत बंद, शिऊर बंगला, झाल्टा फाट्यासह चित्तेपिंपळगाव येथे आंदोलन‎




आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस सुरू असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात गुरुवारी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा, सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा, बनकिन्होळा, वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर करमाड येथे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सुनील चव्हाण यांनी आंदोलनस्थळी आपली व्यथा मांडत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यांची लहान मुलगी कोमल हिचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध आहे. मात्र, मोठी मुलगी उज्ज्वला हिचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीचे प्रकरण समाज कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही १२ महिने उलटून गेले तरी प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. काटशेवरी फाटा येथे दीड तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निवेदन देण्यात आले. काटशेवरी फाटा येथे आंदोलन सुरू होताच फुलंब्रीकडून खुलताबादकडे येणारी तसेच खुलताबादकडून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. शिऊर बंगला येथेही रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असूनही शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र निदर्शने करण्यात आली. चितेपिंपळगाव येथे सकाळी ९ वाजता तर झाल्टा फाट्यावर सकाळी ११ वाजता महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांची खालावणारी प्रकृती पाहता मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन उपोषण सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात गारखेडा, आपतगाव, भालगाव आणि पाचोड एकोड परिसरातील नागरिक व सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धानोरा फाट्यावर तहसीलदार वाघमारे यांनी स्वीकारले निवेदन सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने धानोरा फाटा येथे गुराढोरांसह बैलगाड्या रस्त्यावर आणत एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी सिल्लोड तालुक्यासह पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाड्या, गुरेढोरे आणि नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने धानोरा फाटा येथे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. तहसीलदार सागर वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *