![]()
बिडकीन जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे यांनी गटातील विविध गावांचा दौरा करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. मनोज पेरे यांनी आपल्या दौऱ्यात सोमपुरी, शेकटा, निलजगाव, लाखेगाव, वरवंडी, फारोळा आणि कृष्णापूर या गावांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या, शिक्षकांची उपलब्धता आणि इतर सुविधांची पाहणी केली. निलजगाव येथील भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी नेहमी गैरहजर असतात, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. यावरून पेरे यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘साहेब रजेवर आहेत’ किंवा ‘ट्रेनिंगला गेले आहेत’ अशी उत्तरे दिल्याने पेरे यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘असला कारभार खपवून घेतला जाणार नाही, मी स्वतः वेळोवेळी सरप्राइज व्हिजिट देणार आहे,’ असा इशारा देत त्यांनी कारभारात सुधारणा करण्याचे आदेश दिले. आपण दरमहा बिडकीन गटातील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांचे प्रश्न सोडवणार असल्याचे मनोज पेरे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी स्वतः दारात येऊन समस्या जाणून घेत असल्याने ग्रामस्थांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. निलजगाव येथे ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेताना जि. प. सदस्य मनोज पेरे.
Source link
बिडकीन जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जि.प.सदस्य मनोज पेरेंच्या प्रत्यक्ष भेटी:गैरहजेरीवरून कर्मचाऱ्यांना धरले धारेवर, नागरिकांशी साधला संवाद