![]()
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पैठणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर आपली ओळख जपणाऱ्या प्रथम मानाच्या कापड मंडई गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची तयारी यंदा उत्साहात सुरू झाली आहे. ८५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या मंडळाने सामाजिक प्रबोधनाचा वसा निरंतर कायम ठेवला असून, यंदा वाढती महागाई आणि युवकांपुढील रोजगाराची आव्हाने या ज्वलंत विषयांवर प्रबोधनात्मक सजीव देखावे सादर करण्याचा संकल्प केला आहे. या ऐतिहासिक मंडळाची स्थापना १९४१ मध्ये स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष त्र्यंबकदास पटेल यांनी केली. निजाम राजवटीच्या काळात राजकीय व सामाजिक अडचणींवर मात करत ही गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली गेली. कालांतराने स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत सजीव देखावे, नाटके, नृत्यकला मेळावे आणि वैचारिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या मंडळाने केले. सध्या अध्यक्ष गौरव आठवले यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या उत्सवाची भव्य तयारी सुरू आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या मंडळाच्या गणेशोत्सवाला राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली आहे. माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पैठणमध्ये येऊन या गणरायाची आरती केली आहे. पुढे माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी हा वारसा अधिक समृद्ध करत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी पैठणकरांना उपलब्द करून दिली आहे.
Source link
कापड मंडई गणेश मंडळ:पैठणला सामाजिक प्रश्नांवर सजीव देखावे, 85 वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचा वसा यंदाही सुरूच