.

चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक जिल्ह्यासह विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी कावडीने तीर्थ आणून बाणेश्वर महादेवांचा जलाभिषेक केला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण आश्रम परिसर दुमदुमून गेला. कावड यात्रेमुळे आश्रम परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
चौथ्या श्रावणी सोमवाराच्या पवित्र पर्वानिमित्त येथील जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांतिधाम येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाशिक येथून रामकुंडावरील पवित्र जल घेऊन आलेल्या कावड धारकांना प्रथम जलाभिषेक करण्याचा मान देण्यात आला. यानंतर नामजप, सत्संग, प्रवचन, नित्य नियम विधी, आरती यांसह विविध कार्यक्रम पार पडले. जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे मौनव्रत असल्याने त्यांनी उपस्थित भाविकांना लेखी संदेश दिला. पत्रम्-फलम्-पुष्पम्- तोयम् अशा अल्पशा पूजेने देखील भगवान शिव प्रसन्न होतात. अत्यंत दयाळू आणि भक्तवत्सल भगवान शिव आहेत. शिवभक्ती केल्याने आपणच काय आपल्या पितरांचा देखील उद्धार होऊ शकतो. मनुष्य जीवन सार्थकी करायचे असेल तर शिवभक्ती करणे आवश्यक आहे.. “ज्याने शिव भक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली’ हे संतवचन आहे. म्हणूनच प्रत्येक शिवभक्ताने सोमवार व्रत, प्रदोष व्रत करावे. दुर्लभ असलेला मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे. शिवभक्ती शिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार नाही, ज्याने शिवभक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली, असे सांगून मनुष्य जीवनात येऊन प्रत्येकाने शिवभक्ती करणे आवश्यक आहे. स्वर्गीची अमर इच्छिती मृत्यूलोकी जन्म व्हावा. भक्तीचा आनंद केवळ मनुष्य देहातच मिळू शकतो. ‘शिव-शिव अक्षरे दोन जो वदे रात्रंदिन धन्य तयाचा संसार’.. या प्रमाणे भगवान शिवाच्या नामाचा जप करा. सतत पुण्यकर्म करत रहा, जपानुष्ठान करा, श्रमदान करा, लहान मुलांवर बालवयातच योग्य संस्कार करा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचा संदेश जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांनी दिला.