Headlines

जुन्या रुढी-परंपरा,अंधश्रद्धा त्यागून आता शिक्षणाची कास धरा- आनंद चैतन्य महाराज:हिवरखेडा गौताळा येथील साधक परिवाराच्या वतीने सप्ताह‎




या संपूर्ण सृष्टीचा रचयता निर्गुण निराकार परमेश्वर आहे. त्याने अत्यंत सुंदर जग आपल्याला दिले असून ते समजून घेऊन प्रत्येकाने सत्कर्म केले पाहिजे. समाजातील जुन्या, जिर्ण रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धांचा त्याग करून युवकांनी शिक्षणाची कास धरावी, असे प्रतिपादन आनंद चैतन्य महाराज यांनी केले. हिवरखेडा गौताळा येथे आयोजित हनुमान सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. हिवरखेडा गौताळा येथील हनुमान मंदिर समिती व आनंद चैतन्य साधक परिवाराच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या सांगता प्रसंगी महाराजांचे सुश्राव्य संगीतमय प्रवचन झाले. त्यांनी धरिला पंढरीचा चोर या अभंगावर निरूपण केले. निसर्गाने आपल्याला दिलेली फळे-फुले आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. कर्मकांड, प्राणीहत्या व अंधश्रद्धेमुळे माणसाच्या जीवनातील आनंद हिरावला जातो. त्यामुळे तरुणांनी व्यसनाधीन न होता आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण घेऊन देशाची उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी कन्नडच्या नगराध्यक्षा फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, सरपंच सुमनबाई प्रेमसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राठोड आणि खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमप्रसंगी शेषराव जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर सरपंच सुमनबाई जाधव यांनी आभार मानले. या सोहळ्यास बालचंद राठोड, रोहिदास हरी राठोड, मोहन केसू राठोड, ज्ञानदेव बाळा जाधव, प्रेमसिंग जाधव, गयाबाई जाधव, जमुनाबाई राठोड, इंदुबाई जाधव, सविता जाधव, मालीबाई राठोड, निलाबाई राठोड, नालोभाई राठोड, जनाबाई राठोड, कलाबाई जाधव, शिवराम राठोड यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक गाव, एक यात्रा ही संकल्पना प्रत्यक्षात आली ः नगरसेवक अब्दुल जावेद नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, पूर्वी गावात विविध गटतट होते आणि एकाच देवाची दोन ठिकाणी यात्रा भरत होती. मात्र, आनंद चैतन्य महाराजांच्या आवाहनामुळे हे सर्व गट संपुष्टात येऊन एक गाव, एक यात्रा ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. यामुळे गावात आता गुण्यागोविंदाचे व आनंदी वातावरण निर्माण झाले असून, सीमावर्ती हिवरखेडा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *