![]()
अहिल्यानगर वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात घेता कामरगाव (ता. नगर) ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून वन्यप्राण्यांसाठी ५ पाणवठे तयार केले. या स्तुत्य उपक्रमाची नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ पाहणीच नाही,
.
कामरगाव परिसरात वनविभागाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र असून, येथे हरीण, मोर, ससे, रानडुक्कर आणि तरस यांसारखे वन्यप्राणी आढळतात. या मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी माजी सरपंच तुकाराम कातोरे व वन्यप्राणी सेवा समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी लोकसहभागातून डोंगर रांगेच्या पायथ्याशी नाविन्यपूर्ण पाणवठे उभारले आहेत. कामरगावचा हा उपक्रम पाहून तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर आणि वरिष्ठ लिपिक सुहास लांडगे यांनी एका महिन्याचा टँकरचा खर्च स्वखर्चातून करण्याची घोषणा केली. यामुळे वन्यप्राणी समितीला मोठे पाठबळ मिळाले आहे.
या कामासाठी सरकारी निधी घेतला जात नाही. गावात होणारे वाढदिवस, लग्न समारंभ, वर्षश्राद्ध किंवा बारसे यांसारख्या कार्यक्रमांतील अनावश्यक खर्च वाचवून ग्रामस्थ या समितीला मदत करतात. यातूनच टँकरद्वारे पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. “कामरगाव येथे लोकसहभागातून होत असलेले काम पाहून आनंद झाला. हे आपले स्वतःचे काम आहे या भावनेतून लोक मदत करत आहेत. सरकारच्या मदतीची वाट न पाहता सामाजिक उपक्रमांसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार संजय शिंदे यांनी केले.
यावेळी वन्यप्राणी सेवा समितीचे अध्यक्ष तुकाराम कातोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, रविराज साठे, प्रदीप साठे, अंबादास रोहकले, सुखदेव वेताळ, ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे, अनिल ठोकळ आदी उपस्थित होते. असे आहेत हायटेक पाणवठे रचना : जेसीबीच्या साह्याने २५ फूट लांब, २४ फूट रुंद आणि ४ फूट खोल खड्डा. पिचिंग : तळाला शेततळ्याचा जाड कागद अंथरून त्यावर दगडांची पिचिंग केली आहे. फायदा : यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, कागद चोरीला जात नाही आणि पाणी पिताना एखादा पक्षी किंवा प्राणी पडला तर त्याला दगडांच्या आधाराने बाहेर पडता येते. पाणवठ्यात टँकरने पाणी सोडताना कामरगाव ग्रामस्थ.