Headlines

कुरुंदा शिवारात चाकुचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले:3 जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




वसमत ते कुरुंदा मार्गावर कुरुंदा शिवारात दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या दोघांना दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात रविवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता दुचाकीवरील तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील विठ्ठल पुंड व त्यांचे सहकारी पुणे येथून दुचाकीवर गावाकडे निघाले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन वसमत ते कुरुंदा मार्गावर कुरुंदा शिवारात आले असतांना तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे पुंड व त्यांचे सहकारी खाली पडले. यावेळी तिघांनी पुंड यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली त्यानंतर त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील साडे आकरा हजार रुपये रोख, पाच ग्राम वजनाची अंगठी व दोन मोबाईल घेतले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पुंड व त्यांचे सहकारी घाबरून गेले. मात्र तिघांजवळ चाकु असल्यामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही. त्यानंतर तिघांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन दुचाकीवरून वसमतकडे पळ काढला. या प्रकारानंतर पुंड यांनी सदर प्रकार गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर गावकरी तातडीने घटनास्थळी आले. या प्रकरणी पुंड यांनी सायंकाळी कुरुंदा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अनोळखी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. एल. गंधकवाड, उपनिरीक्षक यु. यु. कारामुंगे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता दुचाकीवरील तीन चोरटे दुपार पासूनच तेथे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार आता पोलिसांनी संशयीतांचा शोध सुरु केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *