![]()
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेतील 69 विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास झाल्यानंतर, आता बिजूधावडी आश्रमशाळेतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. एकापाठोपाठ दोन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि. 25) रात्री टिटंबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. प्रकृती बिघडल्याने 69 विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 62विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर उर्वरित सात विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तपासणी सुरू टिटंबा येथील घटना ताज्या असतानाच रविवारी (दि. 26) रात्री 8 वाजेच्या सुमारास बिजूधावडी आश्रमशाळेतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ बिजूधावडी आश्रमशाळेत धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली असून प्रथमदर्शनी विषबाधेसदृश लक्षणे आढळली नसली, तरी विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिली. पाण्यामुळे अपाय झाल्याची शक्यता टिटंबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलाइज्ड किचनमधून भोजनाची व्यवस्था केली. याच स्वयंपाकगृहातून परिसरातील चार ते पाच आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवले जाते. मात्र, प्रकृतीची तक्रार टिटंबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकडूनच आल्याने अन्नातून विषबाधेची शक्यता कमी असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. पाण्यामुळे हा प्रकार घडला का, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आदिवासी विकास मंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी टिटंबा आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी आजारी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली, तसेच तेथे उपस्थित पालकांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.
Source link
मेळघाटातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली:बिजूधावडीतील 25 ते 30 विद्यार्थ्यांना तीव्र पोटदुखी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण