Headlines

कॅम्पस क्राइम:व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग, विद्यार्थ्यावर केला कटरने हल्ला; संभाजीनगरमधील घटना




महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणाने प्रथम वर्ष बी.टेकच्या विद्यार्थ्यावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील महाविद्यालयाच्या गेट क्रमांक ५ जवळील मोकळ्या मैदानात ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर तब्बल आठ टाके पडले आहेत. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिशांक जगदीश पाटील (२०, रा. मिलिंदनगर, जि. वर्धा; सध्या रा. दिशानगरी, बीड बायपास) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो स्थानिक महाविद्यालयात बी.टेक प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. जिशांक पाटील आणि त्याच्या वर्गमित्रांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आरोपी शिवम स्वामी (मूळ रा. लातूर; सध्या रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) याने काही दिवसांपूर्वी या ग्रुपमधील विद्यार्थिनींना उद्देशून अयोग्य, आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ग्रुपचा प्रशासक असलेल्या जिशांकने नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे शिवमला तत्काळ ग्रुपमधून काढून टाकले. याचाच राग धरून शिवमने २९ सप्टेंबर रोजी फोन करून, “मला ग्रुपमधून का काढले?” असा जाब विचारला. दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबर रोजी दुपारी, शिवमने जिशांकला भेटण्याच्या बहाण्याने महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले. तेथून त्याला लगतच्या मोकळ्या मैदानात नेले. “मी सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतला,” असे जिशांकने सांगताच शिवमने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर, “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत खिशातून कटर काढला. त्याने जिशांकच्या गळ्यावर, डाव्या पायाच्या मांडीवर, उजव्या गुडघ्यावर गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जिशांकला मित्रांनी रिक्षातून तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे पुढील तपास करत आहेत. शैक्षणिक परिसरातील टवाळखोरांचे अड्डे बीड बायपास आणि लगतच्या शैक्षणिक संकुलांच्या गेट क्रमांक ५ कडील अंतर्गत रस्ते व मोकळी मैदाने सध्या टवाळखोरांचे अड्डे बनली आहेत. महाविद्यालयीन प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था केवळ मुख्य प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे बाहेरील तरुणांचा परिसरात बिनदिक्कत वावर वाढला आहे. सातारा पोलीस ठाण्याचे “दामिनी पथक’ अथवा बीट मार्शलची नियमित गस्त या परिसरात पूर्णपणे निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. ‘व्हर्च्युअल इगो’चे प्रत्यक्ष हिंसेत रूपांतर डिजिटल अहंता आणि आक्रमकता: व्हॉट्सॲप ग्रुपवरून काढून टाकणे, सोशल मीडियावर ब्लॉक करणे, टिप्पणी हटवणे या आभासी कृतींना तरुण वर्ग थेट आपली “प्रतिष्ठा’ आणि “अहंता’ मानू लागला आहे. डिजिटल विश्वातील नकार पचवता न आल्याने तरुणांची मानसिकता हिंसक वळण घेत असल्याचे यातून स्पष्ट होते. पालकांच्या नियंत्रणाचा अभाव: छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी येथे येतात. वसतिगृह किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पालकांचे थेट नियंत्रण नसते. महाविद्यालयांचे लक्षही केवळ हजेरीपुरते मर्यादित राहते. त्यामुळे दिशाहीन मुले संघर्षाच्या विळख्यात अडकत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *