![]()
केतन अग्रवाल याच्या खुनाचा कट रचताना आरोपींनी केवळ प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीच केली नाही, तर यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, केतनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर दुःख कसे व्यक्त करायचे, अधिक दुःखी कसे दिसायचे, याबाबत सिया गोयल हिने चॅटजीपीटीवर माहिती शोधल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या तपासानुसार, 18 जून 2026 रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर केतनचे कुटुंबीय लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले. त्यावेळी सियाने अपेक्षित पद्धतीने दुःख व्यक्त केले नसल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यानंतर घरी गेल्यावर सियाने दुःख कसे व्यक्त करावे, तसेच अधिक दुःखी भावना कशा दाखवाव्यात, याबाबत ऑनलाइन सर्च केल्याचे डिजिटल पुराव्यांच्या तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅटवरील चॅट, शेअर केलेली माहिती तसेच डिजिटल उपकरणांमधील इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले असून ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात दाखल करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. ‘पोलिस पकडतील’ या भीतीने रणनीतीचा शोध केतनच्या खुनानंतर काही काळ आरोपींना आपण आखलेल्या कटामुळे पोलिसांच्या हाती लागणार नाही, असा विश्वास होता. मात्र, त्यानंतर चेतनला पकडले जाण्याची भीती वाटू लागली. त्यावेळी सियाने त्याला आधार दिला. पुढे सियाचाही आत्मविश्वास डळमळू लागल्यानंतर चेतनने तिला धीर दिल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर रितेशच्या सल्ल्याने पोलिसांनी पकडल्यास कसे वागायचे, चौकशीदरम्यान काय उत्तर द्यायचे आणि घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळायची, याबाबतही ऑनलाइन सर्चिंग झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे अटकेनंतर आरोपी तुलनेने शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होते, असा तपास यंत्रणेचा दावा आहे. राजा रघुवंशी हत्याकांडाची ‘केस स्टडी’ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खुनाचा कट रचण्याच्या दिवशी आरोपींनी सुरुवातीला सोनम रघुवंशी हिने घडवलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा अभ्यास केला. त्यातील चुकांची माहिती त्यांनी शोधल्याचे तपासात आढळले. यानंतर लोणावळा परिसरात यापूर्वी याचपद्धतीने घडलेल्या दरीत पडून मृत्यूच्या घटनांचाही शोध घेण्यात आला. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर तरुणीचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनांची माहिती आरोपींनी शोधली. सिया, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्यात ही माहिती सोशल मीडिया आणि मेसेजिंग माध्यमातून शेअर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘मशरूम’ने विषप्रयोगाचाही शोध सियाने केतनला ठार करण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यात अन्नपदार्थातून विषप्रयोग करण्याच्या शक्यतेचाही समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘Mushroom use woman kill family by mushroom’, ‘Is it easy to kill someone’ तसेच ‘How to manipulate people’ अशा स्वरूपाचे सर्च केल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे मशरूम किंवा अन्नपदार्थाच्या माध्यमातून केतनला संपवण्याचा स्वतंत्र प्रयत्न अथवा कट होता का, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मात्र, या सर्चिंगचा प्रत्यक्ष खुनाच्या कटाशी नेमका संबंध काय, याचा अंतिम निर्णय न्यायालयीन पुरावे आणि सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Source link
केतन अग्रवाल खून:सियाने दुःख व्यक्त कसे करावे, हे चॅटजीपीटीवर सर्च केले होते, राजा रघुवंशी हत्याकांडाचाही केला होता अभ्यास