Headlines

कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट ब्लॉक IBच्या अहवालानंतरच:नाना पटोलेंचा आरोप; रीलसाठी स्टंटबाजी म्हणत फडणवीसांनाही टोला




देशात वाढत असलेल्या जनक्षोभाला दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी, या सोशल मीडिया हँडलचे अकाऊंट ब्लॉक आणि हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आयबी,चा हात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. सोशल मीडियावरील विरोधी आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देशात सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढत असल्याचा अहवाल आयबीने केंद्र सरकारला दिला होता. जनतेतील हा रोष वेळेत नियंत्रणात आणला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा या गोपनीय अहवालात देण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. या अहवालानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित सोशल मीडिया अकाऊंटवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही पटोलेंनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकार सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करून लोकांचा आवाज थांबवू शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. देशातील शेतकरी, बेरोजगार तरुण, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला. जनतेचा हा रोष आता कोणत्याही क्षणी मोठ्या स्वरूपात बाहेर पडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. विरोधकांची अकाऊंट्स बंद करण्याऐवजी सरकारने वास्तव परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही पटोलेंनी दिला. फडणवीसांचा वंदे भारतने प्रवास केवळ रीलसाठी दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिर्डी दौऱ्यावरूनही नाना पटोलेंनी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईहून शिर्डीपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला होता. मात्र हा दौरा केवळ जनतेसमोर प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि सोशल मीडियावर रील तयार करण्यासाठी असल्याचा आरोप पटोलेंनी केला. काही दिवसांपूर्वी मंत्रालय ते विधानभवन असा मोटरसायकल प्रवासही त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी केला होता, असा टोला त्यांनी लगावला. सरकारने जनहिताचे निर्णय घ्यावेत पटोले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिर्डीपर्यंत ट्रेनने गेले असले तरी त्यानंतर नागपूरपर्यंतचा प्रवास ते रस्त्याने करणार आहेत. त्यांच्या ताफ्यात प्रत्येक जिल्ह्यातील सुरक्षा वाहने सहभागी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होईल. त्यामुळे प्रत्यक्षात इंधन बचत किती आणि सरकारी पैशांचा अपव्यय किती, याचा हिशोब जनतेला देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने केवळ दिखावूपेक्षा वास्तवात बचत आणि जनहिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *