![]()
प्रतिनिधी | दावरवाडी “भक्ताच्या अंतःकरणात जर दृढ विश्वासाचे आणि भक्तीचे बळ असेल, तर त्याची बुद्धी विचलित न होता स्थिर होते. हीच स्थिर बुद्धी माणसाला हरीच्या चरणी लीन करते. ज्याच्या हृदयात ईश्वरी नामाचा प्रकाश आहे, त्याला संपूर्ण चराचरात ईश्वराचेच रूप दिसते,’ असे प्रतिपादन कीर्तनकार कृष्णा महाराज नवले यांनी केले. पैठण तालुक्यातील कौंदर येथे शन्नैश्वर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता शनिवारी (१६ मे) झाली. या सांगता सोहळ्यात नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण कौंदर परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. काल्याच्या कीर्तनासाठी कृष्णा महाराज नवले यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगाचे निरूपण केले. महाराजांनी आपल्या ओघवत्या आणि सुबोध शैलीत अनेक सुंदर उदाहरणे देत या अभंगाचा मथितार्थ भाविकांसमोर मांडला. ते म्हणाले की, ज्या वैष्णवांनी आणि साधकांनी आपल्या हृदयात कृष्णरूपी भक्तीचा मणी धारण केला आहे, त्यांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन अवघ्या जगात त्यांना ईश्वरी चैतन्याचा प्रकाश दिसतो. सप्ताहाच्या सांगतेचा हा गोपाळकाला सर्व भाविकांनी हेवेदावे विसरून, एकत्र येऊन अत्यंत आनंदाने आणि आदराने एकमेकांना वाटावा. सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. आम्ही भक्तीच्या बळावर भूमंडळावरील वीर नवले महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराज गर्वाने सांगतात की, आम्ही भक्ती आणि नामाच्या बळावर या भूमंडळावरील सर्वात श्रेष्ठ आणि बळकट वीर आहोत. आजच्या धकाधकीच्या युगात मानवी मनाला शांतता केवळ हरिभक्तीच देऊ शकते. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .
Source link
कौंदर येथील सप्ताहाची काल्याने सांगता:नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले