![]()
लातूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटनांची मालिका सुरूच असून, चाकूर येथील 6 वर्षीय चिमुरड्याचा त्याच्याच चुलतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकामागून एक घडलेल्या या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) या विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या टोकाच्या वादातून आपली दोन लहान मुले, शिवानी आणि शिवांश यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून मोठे भांडण झाले होते. याच रागाच्या भरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता आपल्या दोन्ही चिमुरड्यांना घेऊन घराबाहेर पडल्या, ज्याचा शेवट या भीषण दुर्घटनेत झाला. सोमवारी सकाळपासून निकिता आणि मुलांचा शोध घेतला जात होता, मात्र दुपारच्या सुमारास घराशेजारील विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. एकाच वेळी आईसह दोन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने खरोसा गावासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source link
कौटुंबिक वादाचा भीषण अंत:लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी मारली; परिसरात खळबळ