![]()
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघाजणांनी आज आपल्या वर्गातील विद्यार्थ्यावर धारदार खांजराने हल्ला चढवला. या हल्ल्यात महावीर गोविंद धुमाळ हा इयत्ता दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. महावीरच्या अंगावर तब्बल नऊ वार आहेत. गंभीर जखमी झालेल्या महावीरवर शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या असर्जन येथे शंकरराव चव्हाण विद्यालय आहे. या विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी महावीर गोविंद धुमाळ याचे आणि त्याच्याच वर्गातील अन्य दोघांशी शनिवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात महावीर धुमाळ आणि त्याच्या काही मित्रांनी त्या दोघांना मारहाण केली होती. ही घटना कोणीही शाळेतील मुख्याध्यापक अथवा आपल्या नातेवाईकांना सांगितली नव्हती. याच घटनेचा राग मनात धरून रविवारी, दिनांक २ ऑगस्ट रोजी विधी संघर्षित बालकांनी नांदेड शहरातून धारदार खंजर खरेदी केला. तो सोबत घेऊन आज, दिनांक ३ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी १०.२० वाजता शाळेच्या इंटरव्हलमध्ये महावीर गोविंद धुमाळ याच्याशी वाद घातला. या वादातून त्याला शाळेलगत असलेल्या गणपती मंदिराजवळ नेण्यात आले. तेथे पुन्हा वाद झाला. त्यात आपल्या जवळील खंजीराने विधी संघर्षित बालकाने महावीर गोविंद धुमाळ याच्या गळ्यावर दोन, पोटात पाच, दोन्ही हातावर एक-एक असे वार केले आहेत. घटनेची माहिती कळताच मुख्याध्यापक कोकरे घटनास्थळी धावले. यावेळी विद्यार्थ्यांनी धावपळ केली. मुख्याध्यापक कोकरे यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना जखमी अवस्थेतील महावीर धुमाळ याला देऊन नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती केले. या ठिकाणी महावीर धुमाळ याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्याध्यापक कोकरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांना कळवली. माहिती मिळताच ओमकार चिंचोळकर हे फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेला खंजीर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी व गंभीर दुखापत केल्याप्रकरणी विधी संघर्षित बालकांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Source link
क्रिकेटच्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्यावर वर्गातील मुलांकडून चाकू हल्ला:नांदेडमधील धक्कादायक घटना, दोन अल्पवयीन ताब्यात