.

हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २९ रोजी शहरात काढण्यात आलेल्याक्रीडा रॅलीने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडाशक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत मंडळाच्या विविध क्रीडा विभागांतील हजारो विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, प्राध्यापक, विभागप्रमुख व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस आयुक्त डॉ. राकेश ओला, डीसीपी प्रांजली सोनोने, मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके आणि सचिव डॉ. माधुरी चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, प्रा.दीपा कान्हेगावकर यांच्या पुढाकाराने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य आणि पोलिस आयुक्त डॉ. राकेश ओला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरातून निघालेली रॅली गांधी चौक, जवाहर गेटजयस्तंभ चौक मार्गे राजकमल चौक येथे पोहोचली. विविध क्रीडा विभागांच्या सहभागामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले होते. मेजर ध्यानचंद तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचे छायाचित्र असलेले फलक, व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक आणि राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या घोषणांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. राजकमल चौक येथे रॅलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक आणि विविध भारतीय पारंपरिक खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. अवघड कसरती, चित्तथरारक हालचाली आणि खेळाडूंचे विलक्षण कौशल्य पाहून राजकमल चौकात उपस्थित नागरिक व युवक मंत्रमुग्ध झाले. भारतीय पारंपरिक खेळांच्या प्रात्यक्षिकांनी आपल्या मातीत रुजलेल्या क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवले. तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे, मोबाईल आणि व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडून शरीर व मन सुदृढ ठेवावे, असा प्रभावी संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम युवकांना प्रेरणा देणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरला. कार्यक्रमाचा समारोप यावेळी वंदे मातरम्चे, राष्ट्र गीत सामूहिक गायन करण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी डॉ. दीनानाथ नवाथे, डॉ. संजय तीरथकर, डॉ. महेंद्र लोणकर, डॉ. प्रमोद भालेराव, डॉ. देवानंद सावरकर, डॉ. मधुकर बुरनासे, प्रा. दीपा कान्हेगावकर, डॉ. मनोज कोहळे, डॉ. केनेडी सिंग, देवेंद्र भुयार, अनिल नागपुरे, डॉ. ललित शर्मा आणि प्रा. आशिष हटेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. हटेकर यांनी केले.
व्यसनाच्या आहारी जाऊ नका : पोलिस आयुक्त डॉ. ओला आजची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. या शक्तीला योग्य दिशा देण्याचे काम खेळच करू शकतात. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मनावर नियंत्रण निर्माण होते, शिस्त लागते आणि संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित होते.व्यसन हे व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान करणारे आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून खेळ, शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये स्वतःला झोकून द्यावे. असे मार्गदर्शन करीत आयुक्त राकेश ओला म्हणाले, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने क्रीडा क्षेत्रात अमरावतीची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या खेळाडूंनी दाखविलेली शिस्त, ऊर्जा आणि क्रीडा कौशल्य निश्चितच प्रेरणादायी आहे.