![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावाला होत असलेल्या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. १९ सप्टेंबर रोजी ‘दिव्य मराठी’मध्ये ‘कोल्ही प्रकल्प कोरडा, ३.९८ टक्के पाणीसाठा; परिसरात टंचाईचे सावट’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, गटविकास अधिकारी ज्ञानदेव जायभाये आणि पाणीपुरवठा अभियंता सुरेंद्र वारे यांनी कोल्ही प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांनी सुमारे एक किलोमीटर पायपीट करत मुख्य जलवाहिनी, विहीर व पंपहाऊसची पाहणी केली. प्रकल्पात जलसाठा दोन टक्क्यांपेक्षा खाली गेल्याने पाणी पूर्णपणे हिरवे पडले असून, त्यात गाळ, माती व शेवाळ मोठ्या प्रमाणात आढळले. यामुळे थेट अशुद्ध पाणी पुरवले जात असल्याचे उघड झाले. १९७० मध्ये उभारलेले मुख्य पंपहाऊस देखभाल-दुरुस्तीअभावी मोडकळीस आले आहे. भिंतींना तडे गेले असून, छताचा स्लॅब कोसळून गंजलेले लोखंड बाहेर आले आहे. विहिरीवरच हे पंपहाऊस असल्याने ते कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात छतातून थेट मोटारींवर पाणी पडल्याने शॉर्टसर्किटचा धोका असून, आजूबाजूला झाडी-झुडपे वाढल्याने साप-विंचवांचा वावर वाढला आहे. नवीन विहीर अन् दुरुस्तीचे आश्वासन यावेळी जि. प. सदस्य संजय पाटील निकम यांनी गाळ रोखण्यासाठी विहिरीभोवती चर मारून वाळू व दगडांचा थर देण्याची सूचना केली. बीडीओ ज्ञानदेव जायभाये यांनी दुरुस्ती व पाणी तपासणीचे निर्देश दिले, तर अभियंता सुरेंद्र वारे यांनी नवीन विहीर व पंपहाऊसचे अंदाजपत्रक लवकरच सादर करण्याचे आश्वासन दिले. वर्षानुवर्षांचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
Source link
खंडाळा येथील दूषित पाणीपुरवठ्यावर तोडगा निघणार; कोल्ही प्रकल्पाची पाहणी