![]()
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी व परिसरातील खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात संघटनेच पदाधिकारी चैतन्य चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, दिलीप जाधव, बाळू पाटील, शुभम मुळे, विलास जाधव, किसन सावंत, उत्तम थोरात, विजय जाधव, बाबाराव जाधव यांनी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. कळमनुरी तालुक्यातील येगाव, पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर या शिवारामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात नुकसानीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्या ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित करून दिल्या होत्या. मात्र या याद्यांमध्ये ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्या नावे अनुदान देण्यात आले तर काही जणांना अत्यंत कमी अनुदान मिळाली. या संदर्भातील तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने चौकशी केली होती. या चौकशीमध्ये खरा प्रकार उघड झाला असून त्यानंतर कृषी सहाय्यक एस. एस. संगमवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील अन्य दोषींवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांवर झालेला अन्या दूर करावा तसेच प्रकरणातील अन्य दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Source link
खरडणी अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई करा:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा