Headlines

खरातच्या कार्यालयात एसआयटी, ईडीची झडती:कारवाईत बंद पाकिटांमधील पुरावे, बॅगा भरून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात




भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक अचानक कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धडकले. यावेळी स्थानिक एसआयटीचे अधिकारीही सोबत होते. कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून प्रत्येक फाईल आणि संगणकीय डेटाची बारकाईने तपासणी करण्यात आली. खरातने फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता आणि त्याचे आर्थिक धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास या कारवाईत करण्यात आल्याचे समजते.कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने सर्व जप्त केलेले साहित्य सीलबंद करून सोबत नेले. तपास पूर्ण होताच ‘ओकस’च्या कार्यालयाला पुन्हा एकदा प्रशासनाकडून अधिकृत सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील बड्या संशयितांचे आणि खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, खरात याने सामान्य नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. या पैशांची गुंतवणूक रिअल इस्टेट आणि हवाला नेटवर्कद्वारे परराज्यात व परदेशात केल्याचा संशय आहे. निकटवर्तीयांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया शक्य भोंदू कॅप्टन अशोक खरातने सर्वसामान्यांची फसवणूक करून जमवलेली मालमत्ता आता ईडीच्या कचाट्यात समोर आली आहे. आजच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे खरातच्या बेनामी संपत्तीचे अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टीजच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात कुठे कुठे जमिनी खरेदी केल्या, याचा शोध आता ईडी घेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांची बँक खाती तसेच मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *