Headlines

गणेशोत्सवावर आक्षेपार्ह वक्तव्ये: विद्याधर बापट यांच्याविरोधात तक्रार:धार्मिक भावना दुखावल्याचा अन् समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप




गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात वाद निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांच्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करणाऱ्या नरेंद्र पंडितराव पाटील यांनी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे ही तक्रार दिली आहे. पाटील यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील वाद टाळण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेल्या गणेशोत्सवाबाबत विद्याधर बापट यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर आणि प्रसारमाध्यमांतून नेहमीच आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांची ही भूमिका फक्त ध्वनीप्रदूषण किंवा डीजेपुरती मर्यादित नाही, तर पारंपरिक ढोल-ताशा पथके, गणेश मिरवणुका आणि धार्मिक परंपरांवरही टीका करत असल्याचा आरोप आहे. कोरोना काळातल्या परिस्थितीचा उल्लेख करत धार्मिक श्रद्धा आणि देवाच्या अस्तित्वाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे कोट्यवधी गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजात दुश्मनी निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, बापट यांच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावरही मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जणांनी म्हटले आहे की, बापटांची भूमिका पाहता, उद्या ते पुण्यातून जाणाऱ्या मानाच्या पालख्यांनाही विरोध करतील की काय अशी भीती वाटते. ढोल-ताशांचा गजर नको, शहरात धार्मिक मिरवणुका नकोत, ही कसली विचारसरणी? स्वतः देव न मानणे ही वैयक्तिक बाब असू शकते; मात्र पुरोगामी असल्याच्या नावाखाली नव्या पिढीवर नास्तिकतेचे विचार लादणे किती योग्य आहे? तक्रारदारांनी या प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवून सखोल तपास करण्यासोबतच पुढील वाद टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *