Headlines

गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदतही दिली. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. केवळ नांदगाव खंडेश्वरच नव्हे, तर इतर तालुक्यांतूनही पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या अशाच तक्रारी समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांना तर मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाईही अद्याप मिळालेली नाही. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही, त्यांची शेतं ज्या महसूल मंडळात येतात, तेथे अतिवृष्टीची नोंद नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, अशी स्थिती आहे. मागील वर्षीची ही परिस्थिती असताना, यावर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळसदृश स्थितीची नोंद झाली, तर आता रबीची पिके काढणीला असताना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *