![]()
परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने “ज्येष्ठत्वाचा गौरव, कर्तृत्वाचा सन्मान” या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामनारायणसिंह खनवे आणि त्यांच्या पत्नी सजलाबाई खनवे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. रामनारायणसिंह खनवे यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी परसापूर येथे झाला. त्यांनी बी.ए., डी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ ते १९७१ या काळात त्यांनी अचलपूर व धारणी येथे शिक्षक म्हणून सेवा बजावली. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सन २००९ मध्ये त्यांनी परसापूर येथे ग्रामीण भागातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. सध्या ते फेस्कॉम संघटनेचे संपर्क सचिव म्हणून चौथ्या टर्ममध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाला २०२६ मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. खनवे दाम्पत्याने आपल्या सहा अपत्यांना उच्चशिक्षित केले असून, त्यांची ज्येष्ठ कन्या न्यायाधीश तर ज्येष्ठ पुत्र समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वयाच्या ७८ व्या वर्षीही सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या खनवे दाम्पत्याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व महाराणा प्रतापची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, अखिल भारतीय वरीष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाशराव पिंपरकर, अंतर्गत तपास अधिकारी विनायकराव पांडे, प्रभाकरराव उमक, ले. कर्नल लक्ष्मणराव गाले, माजी प्र-कुलगुरु वसंतराव जामोदे, डॉ. मुरलीधर वांगे, जयानंद खरड, प्रभाकरसिंह टेहरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. पवार यांनी केले, तर ॲड. प्रमोद खनवे यांनी आभार मानले. पारंभी प्रभुदास फंदे, अनिलराव वानखडे व वैष्णवी यांनी सुमधुर संगीत रजनीचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, श्री गजानन महाराज आणि दर्शनसिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भुवनेश्वर येथील अधिवेशन व सहलीसाठी सहभागी असलेले सचिव डॉ. श्री चंदनसिंह राजपूत, वेणूताई गावंडे, संजय खोंडे, नीताताई खोंडे, अनिल वानखडे, मायाताई वानखडे, मधुकरराव भोपाळे, प्रदीप सातपुते, राजेंद्र राठी, घनश्याम मेश्राम, सुरेश शिर्के, प्रभाताई शिर्के, ॲड. शामराव कपाळे, राधे राधे महिला मंडळाच्या अध्यक्ष शांताबाई खांबरे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
Source link
खनवे दाम्पत्याचा 'ज्येष्ठत्वाचा गौरव' उपक्रमांतर्गत सत्कार:परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाने केला सन्मान