![]()
छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ‘प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुटखा माफियांची गय केली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री झिरवाळ म्हणाले, “शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शासन आणि प्रशासन अत्यंत गंभीर आहे. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन त्या महिला अधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” या प्रकरणातील दोषींवर आणि संबंधित गुटखा माफियांवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले असून, गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गुटखा आणि बनावट अन्नपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमांमुळे अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, अशा कारवायांना अडथळा आणण्यासाठी काही समाजविघातक प्रवृत्तींकडून हल्ल्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र अशा दबावतंत्राला बळी न पडता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा… कळमनुरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई:तीन ट्रकमधून 2.34 कोटींची 1265 पोती सुपारी जप्त; 8 जणांवर गुन्हे दाखल कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या तीन ट्रकची अन्न व औषध प्रशासनाच्या तीन जिल्हयातील पथकाने छापा टाकून तपासणी केली. यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेली २.३४ कोटी रुपये किंमतीची १२६५ पोते सुपारी पकडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुध्द मंगळवारी ता. ९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा…
Source link
गुटखा माफियांची गय केली जाणार नाही:संभाजीनगरमधील घटनेवर मंत्री नरहरी झिरवाळ संतप्त, महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद