![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. “गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट’ करण्यासाठी मला तत्कालीन काळात तब्बल 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी या कोट्यवधींच्या आमिषाला लाथ मारली,” असा खळबळजनक दावा जानकर यांनी केला होता. या विधानावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय सामना रंगला आहे. यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार करताना, “इतक्या वर्षांनंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये करून राळ का उडवली जात आहे?” असा सवाल उपस्थित करत जानकरांच्या दाव्यावर आक्षेप घेतला. तर दुसरीकडे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी “माजी मंत्र्यांच्या या दाव्यात तथ्य असेल तर हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव असून गोकुळ कुणाच्या तरी घशात घालण्याचा हा डाव आहे,” असा घणाघाती आरोप केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राळ उडवण्याचा उद्योग कशासाठी? -हसन मुश्रीफ महादेव जानकर यांच्या 200 कोटींच्या दाव्यावर भाष्य करताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “महादेव जानकर यांचे विधान मी वाचले आणि मला आश्चर्य वाटले. जानकर तत्कालीन सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री होते. जर त्यांना 200 कोटींची ऑफर आली होती, तर त्यांनी त्याच वेळी खुलासा का केला नाही? आता इतक्या वर्षांनी आणि तेही गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर असे बोलण्यामागे नेमका काय हेतू आहे?” गोकुळसाठी मुख्यमंत्र्यांचा संबंध स्वाभाविक मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपांवर मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ हा राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे. मुंबईत शीतकरण केंद्र, पॅकिंग युनिट किंवा जागेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघाला सातत्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी संपर्क ठेवावा लागतो. गोकुळ अमूलपेक्षा मोठा व्हावा, हीच आमची आणि मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक भूमिका आहे.” 8 तारखेला महायुतीचे पॅनेल “गोकुळ निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत महायुतीतील सर्व प्रमुख पक्षांची बैठक झाली आहे. संख्याबळ आणि जागांवर चर्चा झाली असून येत्या एक-दोन दिवसांत तोडगा निघेल. 8 तारखेला आमचे अधिकृत पॅनेल जाहीर होऊन ते बहुमताने निवडून येईल. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात, आमचे निर्णय मुंबईतच होतात; आम्हाला दिल्लीला जाण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी सतेज पाटलांना लगावला. गोकुळ कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव -सतेज पाटील महादेव जानकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. “गोकुळ जर त्या वेळी मल्टिस्टेट झाला असता, तर आज ही निवडणूक लागलीच नसती आणि कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही पत्ताही लागला नसता. आम्ही त्या वेळी रस्त्यावर उतरून दिलेल्या लढ्यामुळेच गोकुळचे अस्तित्व आणि शेतकऱ्यांची मालकी टिकून राहिली.” मंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे लागेल “खुद्द तत्कालीन दुग्धविकास मंत्र्यांनी 200 कोटींच्या ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे या दाव्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. यामध्ये तथ्य असेल तर हे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे मोठे दुर्दैव आहे. गोकुळ संघ कुणाच्या तरी खासगी घशात घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गोकुळवरील हे संकट परतवून लावण्यासाठी सर्व ठरावधारकांनी समविचारी आघाडीच्या पाठीशी उभे राहावे,” असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. पुणे पदवीधरवरून मुश्रीफांचे खंदे समर्थक भैया माने बंडखोरीच्या पवित्र्यात! पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय भैया माने यांनी बंडाचे निशाण फडकवल्याचे समोर आले आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, “भैया माने यांनी पदवीधर मतदारांची मोठी नोंदणी केली होती. त्यांना उमेदवारी मिळावी असा आमचा प्रयत्न होता. मात्र, आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाप्रमाणे ही जागा भाजपला गेली आहे.” “भैया माने अनेक वर्षे माझ्यासोबत सावलीसारखे राहिले आहेत. मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, राज्यपाल नियुक्त जागा किंवा महामंडळाचा पर्याय सुचवला; मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने आता त्यांचा आणि माझा संबंध संपला आहे. युतीधर्म पाळणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. MPSC अध्यक्ष व CJPच्या आरोपांवर मुश्रीफांचे स्पष्टीकरण “एमपीएससीच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शासनाने तत्काळ सचिवांची बदली केली आहे. अध्यक्ष रजनीश भीमनवार हे घटनात्मक पदावर आहेत आणि ज्या परीक्षांवरून वाद झाला, त्या वेळी ते अध्यक्ष नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरच यावर योग्य तो निर्णय होईल; चौकशीशिवाय कोणावरही अन्याय करणे योग्य नाही.” ‘शेल कंपन्या’चा आरोप हास्यास्पद “सीजेपीच्या आंदोलनात अभिजीत दिपके यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला ‘भाजपच्या शेल कंपन्या’ म्हटले, हे अत्यंत हास्यास्पद आहे. दिपके हे राजकारणात नवखे आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांसारखे मातब्बर नेते कुणाच्या दावणीला बांधले जाऊ शकत नाहीत. आपापल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वजण लढत असतात,” असे सांगत मुश्रीफ यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. —————————————————- हेही वाचा… पुणे शिक्षकमध्ये काँग्रेसचे आसगावकर विरुद्ध भाजपचे कौस्तुभ गावडे: महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा सुटला, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला रणसंग्राम! महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या रणधुमाळीला आता पूर्णपणे वेग आला आहे. जागावाटपाच्या जोरदार रस्सीखेचात आघाडी घेत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंतराव आसगावकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, महायुतीमधील अंतर्गत पेच संपुष्टात आला असून पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पारड्यात पडली आहे. भाजपने या मतदारसंघातून श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेचे संचालक कौस्तुभ गावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने पुण्यात आता थेट आणि चुरशीची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर असून, येत्या 23 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
गोकुळच्या मल्टिस्टेटसाठी 200 कोटींची ऑफर?:इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावर राळ का उडवताय?; हसन मुश्रीफांचा महादेव जानकरांना टोला