![]()
विलास घुले खून प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्याचा कट वाल्मिक कराड याने बीड कारागृहातून रचल्याचा खळबळजनक आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या कटाची पुष्टी करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली, ज्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर बजरंग सोनवणे यांनी थेट कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. बीड कारागृह अधीक्षकांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे आणि वाल्मिक कराडवर तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यापूर्वीही आपण कारागृहातील बेकायदेशीर मोबाईल वापर आणि बाहेरील व्यक्तींशी संपर्काबाबत चौकशीची मागणी केली होती, मात्र त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही किंवा माहिती दिली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह कारागृहातून गुन्हेगारी स्वरूपाचे नियोजन होणे हा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपालनाचा अत्यंत गंभीर भंग असल्याचे खासदार सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आता या पत्राची दखल घेऊन कारागृह महानिरीक्षक काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डीआयजींकडून सात तासांची झाडाझडती खासदार बजरंग सोनवणे यांच्या या गंभीर आरोपानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड कारागृहात तब्बल सात तास कसून झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे, या चौकशीदरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून डीआयजी देसाई यांनी स्वतः बराकमध्ये जाऊन कैद्यांशी संवाद साधला व व्हीआयपी ट्रीटमेंट तसेच फोन कॉल्सबाबत थेट माहिती घेतली. कारवाईची टांगती तलवार बीड कारागृहातील या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आता डीआयजी योगेश देसाई यांनी केलेल्या या उच्चस्तरीय आणि गोपनीय चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या चौकशी अहवालानंतर कारागृहातील आणखी काही बड्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची टांगती तलवार आहे.
Source link
विलास घुले प्रकरणी माझ्या मुलाला अडकवण्याचा कट:खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मीक कराडवर गंभीर आरोप, थेट कारागृह महानिरीक्षकांना पत्र