Headlines

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची जोरदार तयारी:दिवसाला थेट 40 हजार मतदारांशी संपर्क, पारंपारिक गड राखण्यासाठी ताकद पणाला




नागपूर पदवीधर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या मतदारसंघाशी भावनिक नाते जोडलेले आहे. एकेकाळी फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि नंतर स्वतः नितीन गडकरी यांनी विधानपरिषदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, पहिल्या दिवसापासूनच पक्षाने आपला पारंपारिक गड राखण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली आहे. मागील निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने यावेळी कंबर कसली असून थेट मतदारांशी संपर्क अभियान तीव्र केले आहे. यासाठी भाजपच्या नागपूर कार्यालयात एक विशेष ‘वॉर रूम’ आणि कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून दररोज तब्बल 40 हजार पदवीधर मतदारांशी संपर्क साधला जात असून, कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने अत्यंत सूक्ष्म आणि जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडून अभिजीत वंजारींना संधी एकीकडे भाजपची जय्यत तयारी सुरू असताना, काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी आपले पत्ते उघड करत विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. वंजारी यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानतानाच, या निवडणुकीत केवळ काँग्रेसच नव्हे, तर सरकारविरोधी सर्व समविचारी संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपसमोर एक मजबूत आणि संघटित आव्हान उभे केले आहे. भाजपच्या उमेदवाराची प्रतीक्षा काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असली तरी, भाजपने अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही. गडकरी आणि फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा वारसा असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसचे हे आव्हान कोण स्वीकारणार आणि भाजपला विजय कसा खेचून आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असल्याने भाजप लवकरच एका तगड्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. 58 वर्षांची मक्तेदारी विरुद्ध 2020 चा धक्का या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता, तब्बल 58 वर्षे नागपूर पदवीधर मतदारसंघावर जनसंघ आणि भाजपचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसने या मक्तेदारीला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला होता. तो अनपेक्षित पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता त्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि आपला पारंपारिक बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने वंजारींच्या रूपाने विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी दंड थोपटले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *