![]()
सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यांचा वापर करून चरसची तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभाग (कस्टम) आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडून एक किलो २४३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बँकॉकहून पुणे विमानतळावर आली होती. तिच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर संशयित हालचालींवर लक्ष ठेवले. संबंधित महिला गडबडीत विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्या सामानाची झडती घेतली असता सौंदर्य प्रसाधनांचे दोन डबे आढळून आले. या डब्यांमध्ये संशयास्पद पदार्थ असल्याने त्याची ‘ड्रग डिटेक्शन किट’द्वारे प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात चरस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही डब्यांमधील पदार्थ जप्त करून त्याचे वजन करण्यात आले. त्याचे एकूण वजन एक किलो २४३ ग्रॅम भरले. अमली पदार्थ बँकॉकहून भारतात आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. विमानतळावर अमली पदार्थांची तपासणी कशी होते? परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची कस्टमकडून एक्स-रे, प्रोफाइलिंग आणि संशयास्पद वस्तूंच्या प्रत्यक्ष तपासणीद्वारे छाननी केली जाते. संशय आल्यास सामान उघडून तपासले जाते. पदार्थ आढळल्यास ‘ड्रग डिटेक्शन किट’ने प्राथमिक चाचणी केली जाते. त्यानंतर नमुने जप्त करून कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील तपास केला जातो. हेही वाचा.. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 49 लाख लुटले; विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
पुणे विमानतळावर 1 कोटींचे चरस जप्त:बँकॉकहून आलेल्या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून केली होती तस्करी