![]()
जातिनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी देशभरातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय बैठक येत्या 11 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देशभरातील विविध ओबीसी संघटनांचे सुमारे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असून, जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न आणि आगामी आंदोलनाची रुपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. या राष्ट्रीय बैठकीला तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंतच्या विविध राज्यांतील ओबीसी संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारीही या परिषदेत सहभागी होणार आहेत. देशात जातिनिहाय जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर असताना ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांच्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जातिनिहाय जनगणनेची आवश्यकता, ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य हक्क, विविध राज्यांतील ओबीसी समाजासमोरील प्रश्न आणि केंद्र सरकारकडे मांडावयाच्या मागण्यांवर या बैठकीत विचारविनिमय होईल अस वडेट्टीवार म्हणाले. विशेषतः जनगणनेत ओबीसींचा वेगळा कॉलम असावा यासाठी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी ही बैठक निर्णायक असणार आहे. बैठकीत या आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. देशभरातील ओबीसी संघटनांना एका समान व्यासपीठावर आणून जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी एकजूट निर्माण करणे, हा या परिषदेचा उद्देश आहे, अस सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.नागपुरात होणाऱ्या या बैठकीतून ओबीसींच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला राष्ट्रीय स्तरावर नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे. जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची पुढील दिशा नागपूरच्या या राष्ट्रीय बैठकीत निश्चित होणार असल्याने या परिषदेकडे देशभरातील ओबीसी संघटनांचे लक्ष लागले आहे.
Source link
जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटना एकवटल्या:11 ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय बैठक, विजय वडेट्टीवारांचा पुढाकार