Headlines

गोकुळमध्ये शासन नियुक्त 4 संचालक भाजप-संघ परिवाराचेच? पात्रता काय?:संजय राऊतांचा सवाल, म्हणाले- अध्यादेश लादणे म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध




कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत राज्य शासनाने अध्यादेश काढून ४ सदस्यांची नियुक्ती केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि विशेषतः भाजप नेत्यांवर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. “हा चमत्कार नाही, तर सैतानाची भुताटकी आहे. महाराष्ट्रावर सध्या सैतानाचे राज्य असून, कोल्हापुरात जे घडवले गेले आहे त्याची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रात पडेल,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ‘ग्रामपंचायतीतही फडणवीसांना इंटरेस्ट असतो’ देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना राऊत म्हणाले, “फडणवीस म्हणतात आम्हाला कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात इंटरेस्ट नाही. पण देवेंद्र फडणवीसांना ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो. ते विरोधकांना ग्रामपंचायत सुद्धा मिळू देत नाहीत. मला वाटते याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की होईल.” पाच नेत्यांच्या ‘पंचका’ला इशारा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत राऊत पुढे म्हणाले, “हा प्रकार अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ या पंचकाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. ही चांडाळ चौकडी आहे, त्यात आता अजून एक (मुश्रीफ) वाढले आहेत.” ‘४ सदस्यांची पात्रता काय? त्यांना सहकारातले काय कळते?’ राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले, “जे चार सदस्य शासन नियुक्त नेमलेले आहेत, त्यांची पात्रता काय? त्यांना सहकारातले काय कळते? ते शेतकरी आहेत का? ते सगळे संघ परिवाराशी आणि भाजप परिवाराशी संबंधित असलेले लोक आहेत. कोणतीही निवडणूक न लढता त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीच्या जोरावर पराभूत झालेले हसन मुश्रीफांचे चिरंजीव, महाडिकांच्या सूनबाई परत एकदा सत्तेवर येतील.” ‘हा चमत्कार नाही, भुताटकी आहे’ निवडणूक हरलेल्यांना सत्तेत बसवण्याच्या प्रकाराची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले, “जगात असा प्रकार कधीच झाला नव्हता की पराभूतांना सत्ता दिली. पण हे असे चमत्कार… मी याला चमत्कार म्हणणार नाही. चमत्कार हा पवित्र शब्द आहे, तो देव करतात. आणि भुताटकी सैतान करतो. महाराष्ट्रावर आता सैतानाचे राज्य आहे.” न्यायालयाच्या निर्णयावर आणि अध्यादेशावर भाष्य औरंगाबाद खंडपीठाने ४ सदस्यांची मते वेगळी (सीलबंद) ठेवण्याच्या दिलेल्या आदेशावर पत्रकारांनी विचारले असता, राऊत यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मते न्यायालयाने स्पष्ट निर्देश आणि संविधानाच्या बाजूने निकाल द्यायला पाहिजे होता. जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुमच्याकडे बहुमत नसते, तेव्हा अध्यादेश काढला जातो. अध्यादेश हे लादणे आहे, ते लोकशाहीच्या विरुद्ध आहे. जे काम देवेंद्र फडणवीसांनी केले, ज्याच्यावर राज्यपालांनी सही केली, त्याला पाठबळ देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही, पण न्यायालयाने जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा.” ————– हेही वाचा.. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:समविचारी आघाडी की महायुती? गोकुळ चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप; 700 पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्यो कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *