Headlines

गौरव:कंबोडियात सोहम बुरकुलच्या "ब्रेक एक्स’ प्रकल्पाला सुवर्णपदक, 15 देशांच्या स्पर्धेत भारताचा डंका




संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या सुपुत्राने आता विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. कंबोडिया येथे पार पडलेल्या “इंटरनॅशनल क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत मूळचा मंगळवेढ्याचा असलेल्या सोहम सतीश बुरकुल याने सुवर्णपदक पटकावले आहे. १५ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सोहमने मिळवलेल्या या देदीप्यमान यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे नाव जागतिक नकाशावर झळकले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील १५ देशांमधून ४० हून अधिक निवडक संघांनी सहभाग घेतला होता. सोहम बुरकुल आणि त्याचा सहकारी प्रवीर कांकरिया यांनी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सादर केलेल्या “ब्रेक एक्स’ (स्मार्ट एनर्जी जनरेटिंग स्पीड ब्रेकर) या प्रकल्पाला जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. रस्त्यावरील गतिरोधकावरून गाड्या जाताना निर्माण होणाऱ्या दाबाचा वापर करून वीजनिर्मिती करणे, ही या प्रकल्पामागची मुख्य संकल्पना आहे. सोहम हा पुण्यातील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल (बाणेर) या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशात शाळेच्या प्राचार्या माधुरी चित्तेवान यांचे मार्गदर्शन आणि शाळेचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. सोहम जरी पुण्यात शिकत असला, तरी त्याचे मूळ गाव मंगळवेढा आहे. त्याचे आजोबा शिवाप्पा बुरकुल आणि वडील सतीश बुरकुल यांनी सोहमच्या संशोधक वृत्तीला नेहमीच बळ दिले. कंबोडियातील आंतरराष्ट्रीय मंचावर सुवर्णपदक स्वीकारताना जेव्हा तिरंगा फडकवला गेला, तेव्हा उपस्थित शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी भारतीय मुलांच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक होत आहे . सोहमच्या या जागतिक यशाची बातमी समजताच मंगळवेढा तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संशोधक वृत्तीचे आणि जिद्दीचे कौतुक होत आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी बुरकुल परिवाराचे अभिनंदन केले असून, सोहमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शाळेमार्फत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते, आम्ही आमचा प्रोजेक्ट तिथे प्रेझेंट केला, परीक्षकांनी आम्हाला निकाल जाहीर केला, वीज निर्माण करणारा गतिरोधक किंवा स्पीड ब्रेकर तयार केला आहे.या गतिरोधकावरून गाडी गेली तर वीज तयार होते. यासाठी डिसी जनरेटर वापरला आहे. रॅक इंजिन वापरले आहे. हा गतिरोधक उंचीनुसार खालीवर होतो. सर्व स्तरांतून सोहमवर कौतुकाचा होतोय वर्षाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *