Headlines

ग्रंथदानातून उभारले जाणार ज्ञानालय; नाकोडे विद्यालयाचा अभिनव उपक्रम:जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार वाचनालय‎




ग्रंथदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नाकोडे येथील मविप्र समाजाच्या शाळांनी अभिनव ग्रंथदान अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०० पुस्तके देण्यासाठी २० नागरिकांनी संपर्क साधला आहे. तालुक्यातील नाकोडे येथील मविप्र समाजाचे आदर्श शिशु विहार, अभिनव बाल विकास मंदिर आणि जनता विद्यालय या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या घरातील कपाटात पडून असलेली किंवा वाचून झाल्यानंतर अडगळीत गेलेली पुस्तके जमा करून त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, सामान्य ज्ञान, शब्दकोश, साहित्यविषयक पुस्तके तसेच विविध नियतकालिकांचा समावेश या वाचनालयात केला जाणार आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यास त्यांच्यासाठी ज्ञानाची नवी कवाडे खुली होतील. अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सामाजिक विकास साधण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, सामान्य ज्ञान, शब्दकोश, साहित्यविषयक पुस्तके तसेच विविध प्रकारचे वाचन साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहभाग घ्यावा. शिक्षक जाणार नागरिकांच्या घरी पुस्तक देणाऱ्या नागरिकांना विद्यालयात येण्याची गरज नाही. विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन पुस्तके सन्मानपूर्वक स्वीकारणार आहेत. हा पुस्तक संकलन उपक्रम १५ मे २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पुस्तके देण्यासाठी नागरिकांनी ७९७२९१६७७६, ८३०८०२७१७२ आणि ९४२३४७९७०९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. असे होतील फायदे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण होईल, विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्य वाचनामुळे शाळेत वाचन संस्कृती रुजेल, वाचनालयामुळे माजी विद्यार्थी व गरजू विद्यार्थी आणि ग्रामस्थ शाळेशी जोडले जातील, विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचे विविध प्रकार समजतील, वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि वार्षिक अंक वाचण्याची संधी मिळेल, पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास आणि सामाजिक घडामोडी समजतील. संस्था सहकार्य करेल ^ नाकोडे येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सुरू केलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. पुस्तके संकलित झाल्यानंतर सुसज्ज वाचनालय उभारण्यासाठी संस्था शक्य ते सर्व सहकार्य करेल. नागरिकांनी वाचून झालेली जास्तीतजास्त पुस्तके देऊन या उपक्रमाला बळ द्यावे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी योगदान द्यावे. – रवींद्र देवरे, संचालक, मविप्र समाज संस्था, नाशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *