Headlines

ग्रामस्वच्छतेत भोकणी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर‎




सिन्नर तालुक्यातील झाडांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भोकणी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ मध्ये नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत नवा मान मिळवला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या बळावर ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रभारी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांचे या यशामागे योगदान मानले जात आहे. लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण विकासकामांच्या बळावर भोकणी ग्रामपंचायतीने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच कामाची दखल घेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ मध्ये ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामपंचायतीने स्वच्छता, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, शासकीय कार्यालये, पाणीपुरवठा विहीर व ग्रामपंचायत कार्यालय येथे सौरऊर्जेचा वापर, जैविक शेती, जिवामृत बेड प्रकल्प, रोपवाटिका, पर्यावरणपूरक प्रवेशद्वार, पक्षी उद्यान, ऑक्सिजन झोन प्रकल्प, नाना-नानी पार्क, प्रशस्त अभ्यासिका, महिला सबलीकरण, महिला संसद भवन, आरोग्यविषयक जनजागृती आणि सार्वजनिक स्वच्छता यांसह विविध क्षेत्रांत प्रभावी काम केले आहे. लोकसहभागाच्या बळावर गावाने एक सक्षम आणि आदर्श विकास पॅटर्न उभा केला आहे. यापूर्वीही ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरीय दोन वेळा प्रत्येकी ५० लाख रुपयांची पारितोषिके मिळवली आहेत. तसेच आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कारामुळेही भोकणी ग्रामपंचायतीला विशेष नावलौकिक प्राप्त झाला आहे. विविध शासकीय योजनांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवत यश संपादन करण्यासाठी ग्रामपंचायत, पर्यावरण दूत, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट सदस्य, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लाभत आहे. ग्रामस्थ, युवक, पर्यावरण दूत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एकत्र करून गावच्या विकासाला सामूहिक चळवळीचे स्वरूप दिले. त्यामुळे स्वच्छता ही केवळ स्पर्धा न राहता गावच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. – सरपंच अरुण वाघ, भोकणी ग्रामपंचायत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *