Headlines

चार वर्षांपासून दुर्लक्ष, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण:सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय‎



तालुक्यातील ग्राम सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून निघाला असून सर्वत्र खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.

.

या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, रस्त्याची खराब अवस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सदर रस्ता २०२० तयारी झाल्यानंतर एका वर्षातच त्याचे पितळ उघडे पडले होते. गत चार वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून, संबंधित विभागाने तातडीने दर्जेदार रस्ता उभारण्याची मागणी बंडूभाऊ सोळंके, किशोर गावंडे, महादेवराव डाबेराव, पांडुरंग सोळंके, पुरुषोत्तम तिवारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरसाठ, प्रदीप गावंडे, नंदू सोळंके, विनोद शिरसाट,आकाश ढोके, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष प्रदीप गावंडे यांच्याद्वारा करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील पूर्णा नदी काठावर वसलेल्या गावांमधून वाळूची अवैधरित्या तस्करी करून वाहतूक होते. यामध्ये म्हैसांग, विरवाडा, सांगवा मेळ, लाखपुरी, खापरवाडा, दापुरा आदी ठिकाणांवरून वाळू माफियांकडून ओव्हरलोड वाहने भरून तस्करी होते. राजकीय वरदहस्त व लोकप्रतिनिधींची भागीदारी यामुळे ग्रामस्थांचा आवाज सातत्याने दाबला जातो. यामुळे देखील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. ग्रामीण भागातील रहिवाशांच्या नशिबी चांगली रस्ते कधी येतील, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची अशीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विकास कोणाचा झाला, असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

ग्रामीण भाग विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात महत्त्वाचे रस्तेच दुर्लक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेवर व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तातडीने दुरुस्तीची मागणी सांगवा मेळ ते कौलखेड जहागीर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे. तसेच भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्याच्या पेरणीच्या ऐन वेळेत शेतकऱ्यांना आपली बैलजोडी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने खते, बी-बियाणे पेरणीचे साहित्य नेताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *