![]()
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. जिजामाता प्राथमिक शाळेने “पर्यावरण रक्षण काळाची गरज’ दाखवणारा चित्ररथ तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने “मानव आणि वन्यजीव संघर्ष’, जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने “महाराष्ट्र ही संतांची भूमी व छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट’ यांचा देखावा असलेला चित्ररथ सादर केला. यावेळी डोक्यावर फेटे बांधलेल्या व कलश धारण केलेल्या व नऊवारी पैठणी परिधान कैलेल्या विद्यार्थिनी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे देखावे असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीचे नागरिकांनी कौतुक केले. झांजर व लेझीम पथक, एनसीसी, स्काऊट गाईड, हरित सेना, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली. सेवानिवृत्त भारत तिब्बत, सीमा पोलिस बल सुभेदार शंकरराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कलश पुजन, कै.दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. संस्थेचा माजी विद्यार्थी अभिषेक पाटील याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल व प्राजक्ता पाटीलची औषध निर्माता कल्याण डोंबिवली मनपापदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा निता पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, खजिनदार अभय पाटील, सिताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, डॉ.सुरेश दरेकर ,लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा केदार जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन निकम आदींसह शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पवार यांनी केले तर सूत्रसंचालन नीलेश खैरे व प्रमोद काळे यांनी केले.
Source link
चित्ररथ, प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक:लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे मिरवणूक