![]()
चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी एका शालेय बसवर पिंपळाचे झाड मुळासकट कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने एका चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यावर आक्षेप घेत, 16 जुलै रोजी पालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सविस्तर चर्चा घडवून आणली होती. या चर्चेअंती प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर रितू तावडे यांनी या दुर्घटनेच्या फेरचौकशीचे आदेश दिले होते. असे असूनही, मुंबई महापालिका प्रशासनाने महापौरांच्या या आदेशाला हरताळ फासला आहे. या प्रकरणाच्या फेरचौकशीसाठी पालिकेने अद्याप कोणत्याही त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केलेली नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि चालढकलीच्या कारभारावर शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असून, पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबत प्रशासन अजिबात गंभीर नसल्याची सडकून टीका त्यांनी केली आहे. महापौरांकडून नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश चेंबूर येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने आपल्याच दोन अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत व्हावी, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना, दुर्घटनेतील झाड 60 ते 70 वर्षे जुने आणि आतून पूर्णपणे पोकळ झालेले होते. तसेच ते कोसळण्यामागे केवळ काँक्रीटीकरण हे एकच कारण नसून इतरही अनेक कारणे असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सभागृहात सांगितले. परंतु, महापौरांनी हा अहवाल अमान्य करत या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा सविस्तर चौकशी करून नवा अहवाल सभागृहात सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले. प्रशासनाच्या वेळकाढूपणावरून प्रश्नचिन्ह महापौरांनी फेरचौकशीचे आदेश देऊन आता 12 दिवस उलटून गेले आहेत, तरीही महापालिका प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. 16 जुलै रोजी सभागृहात झालेल्या या चर्चेचे इतिवृत्त त्याच दिवशी अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले होते. असे असूनही, प्रशासनाने अद्याप ना फेरचौकशी सुरू केली आहे, ना त्यासाठी कोणत्याही त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या आदेशाबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या वेळकाढूपणा आणि दुर्लक्षावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौरांनी चौकशीचा अहवाल फेटाळून लावला चेंबूर दुर्घटनेप्रकरणी सादर झालेल्या पहिल्या चौकशी अहवालाचे मुंबई महापालिकेत तीव्र पडसाद उमटले आहेत. या अहवालामध्ये दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार आणि सल्लागारावर केवळ किरकोळ दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. कारवाईसंदर्भातील प्रशासनाची ही सौम्य भूमिका अमान्य करत, महापौरांनी हा चौकशी अहवाल थेट फेटाळून लावला आहे. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चेंबूरच्या वृक्ष दुर्घटनेत महापौरांनी फेरचौकशीचे स्पष्ट आदेश देऊनही मुंबई महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करत असून, जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी केला आहे. या दुर्घटनेतील पीडित विहान श्रीवास्तव हा काते यांच्या मैत्रिणीचाच मुलगा असून, या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, या त्यांच्या मागणीकडेही प्रशासनाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या वेळकाढू आणि बेजबाबदार धोरणामुळे आता न्यायासाठी विहानचे आई-वडील लवकरच महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही काते यांनी स्पष्ट केले.
Source link
चेंबूर वृक्ष दुर्घटना:महापौरांच्या फेरचौकशीच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेचा वेळकाढूपणा!