Headlines

चोपड्यात वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा मध्यरात्री रस्ता रोको:शिरपूर-चोपडा मार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा




शिरपूर तालुक्यातील बभळाज, तरडी व हिसाळे, अजनाड बगला परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बभलाज येथील महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शिरपूर-चोपडा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी पंपांसाठी रात्री 9 वाजता वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना रात्री 12 वाजेपर्यंतही वीज आली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बभलाज येथील महावितरण कार्यालयासमोर एकत्र येत रस्ता रोको आंदोलन सुरू केले. परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक दिवसांपासून रात्रीचा वीजपुरवठा अनियमित होत असून रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वीज मिळणे अपेक्षित असतानाही वारंवार खंड पडत आहेत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेती पिके धोक्यात आली आहेत. आंदोलनात जयपाल गिरासे, विकास पाटील, विलास परदेशी, समाधान पाटील, अरुण पाटील, भावेश राजपूत, मयूर गुर्जर, प्रदीप बंजारा यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आंदोलन सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत महावितरणचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना वेळेवर वीजपुरवठा न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *