Headlines

छत्रपती संभाजीनगरच्या विकासात MIM चं योगदान काय?:मंत्री अतुल सावेंचा हल्लाबोल, मुलाच्या शाही लग्नाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना 1 कोटींची मदत




“छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासात एमआयएमचे (MIM) काडीचेही योगदान नाही. शहराच्या विकासावर बोलण्यासारखे यांच्याकडे काहीच नसल्याने केवळ जातीयवादी संघटना चालवून जुने मुर्दे उकरून काढणे आणि सामाजिक वातावरण बिघडवणे हाच त्यांचा एकमेव धंदा आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एमआयएमवर जोरदार निशाणा साधला. एमआयएम नेत्या सहर शेख यांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या जन्मदिनाचे उदात्तीकरण केल्याच्या प्रकरणावरून मंत्री सावे यांनी हा थेट हल्ला चढवला. दरम्यान, केवळ राजकीय टीकाटिप्पणीवर न थांबता, मराठवाडा आणि विदर्भातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री सावे यांनी एक मोठा संवेदनशील आदर्शही घालून दिला आहे. आपला धाकटा मुलगा उद्योजक अनुराग सावे आणि उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्या 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यातील सर्व डामडौल आणि शाही थाट टाळत, लग्न अत्यंत साधेपणाने घरगुती स्वरूपात करण्याचा निर्णय सावे व मुळे परिवाराने घेतला आहे. या लग्नात वाचलेल्या पैशांत उद्योगातील निधीची भर घालून तब्बल 1 कोटी रुपयांचा मदत निधी थेट ‘मुख्यमंत्री सहायता निधी’कडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील 50 शेतकरी जोडप्यांचा संपूर्ण खर्चाने सामूहिक विवाह आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या 1 वर्षाच्या शिक्षणाची पूर्ण फी भरण्याची घोषणाही त्यांनी केली. जुने मुर्दे उकरून काय साध्य होणार?; MIM ने विकासावर काम करून दाखवावे -अतुल सावे एमआयएम नेत्या सहर शेख यांच्या औरंगजेब उदात्तीकरणाच्या पोस्टवर संताप व्यक्त करताना मंत्री अतुल सावे म्हणाले, “आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहोत. पण एमआयएमने शहराच्या विकासासाठी आजवर नेमके काय योगदान दिले, याचा जाब आधी त्यांनी जनतेला द्यावा. विकासाच्या मुद्द्यांवर ते कधीही बोलत नाहीत.” जातीयवादी संघटना चालवण्याचे काम “एमआयएम ही निव्वळ जातीयवादी अजेंडा राबवणारी संघटना आहे. इतिहास विकृत करणे, मुद्दाम जुने वाद उकरून काढणे आणि त्यावर चर्चा घडवून आणून तेढ निर्माण करणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. अशा लोकांना महत्त्व देण्यापेक्षा आम्ही छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक, नागरी आणि पायाभूत विकास करण्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत.” दुष्काळाच्या सावटात संवेदनशील निर्णय मुलाच्या विवाहाच्या साधेपणाबाबत आणि सामाजिक बांधिलकीबाबत बोलताना मंत्री सावे म्हणाले, “25 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे माझा धाकटा मुलगा अनुराग आणि ईशा मुळे यांचा विवाह नियोजित होता. स्व. मोरेश्वर सावे यांच्या काळापासून दोन्ही कुटुंबांचा मोठा सामाजिक आणि व्यावसायिक जनसंपर्क आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठा सोहळा करण्याचे नियोजन होते. परंतु मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळ आहे, बळीराजा संकटात आहे. अशा गंभीर परिस्थितीत लाखो शेतकरी बांधव अडचणीत असताना आम्ही मोठा सोहळा साजरा करणे आम्हाला संयुक्तिक वाटले नाही.” 1 कोटींचा निधी समर्पित “घरातील नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला. या वाचलेल्या खर्चातून आणि आमच्या उद्योगातील निधीतून १ कोटी रुपयांचा मदत निधी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे.” नेत्यांनी वायफळ खर्च टाळावा “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा संकटकाळात वायफळ खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. सत्तेतील अथवा पक्षातील इतर नेत्यांनीही आपल्या घरातील सोहळ्यांत अशीच बचत करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 50 शेतकरी जोडप्यांचा सामूहिक विवाह अन् पाल्यांचे 1 वर्षाचे मोफत शिक्षण सावे परिवाराने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सामाजिक उपक्रमांचा मोठा संकल्प जाहीर केला. “दुष्काळात अडकलेल्या गरीब शेतकरी कुटुंबांतील 50 जोडप्यांचा संपूर्ण खर्चासह आम्ही लवकरच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणार आहोत, जेणेकरून त्या पालकांवरील लग्नाचा आर्थिक बोजा हलका होईल. ज्या दुर्दैवी शेतकरी बांधवांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या, त्यांच्या मुला-मुलींच्या 1 वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा शैक्षणिक खर्च (शाळा-कॉलेजची फी) सावे परिवार उचलणार आहे.” शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; 76 लाख शेतकऱ्यांपर्यंत 5,000चा हप्ता पोहोचला! शासनाच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांची आकडेवारी मांडताना त्यांनी स्पष्ट केले. “शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार यापूर्वीच सुमारे 4 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ पोहोचला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून जाहीर करण्यात आलेली 5,000 रुपयांची तातडीची अग्रीम मदत थेट बँक खात्यात ऑनलाईन जमा केली जात असून, आजपर्यंत जवळपास 76 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम यशस्वीरीत्या पोहोचली आहे.” ———————————————– हेही वाचा… बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?: व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *