![]()
आयटी अभियंता पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्यांच्या सासू आणि सासऱ्यांना बुधवारी सकाळी अटक केली. रुग्णालयातून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येताच पोलिसांनी ताब्यात घेऊन ही कारवाई केली. पायल यांचे पती अक्षय अरविंद झांबरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मंगल अरविंद झांबरे (वय 58) आणि अरविंद झांबरे (वय 68, रा. मुकुंदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या सासू-सासऱ्यांची नावे आहेत. पायल यांचा हुंडा, पैसे आणि सोन्यासाठी सासरी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे. पायल यांनी 2 नोव्हेंबर रोजी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. सासरी होत असलेल्या छळामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिस करत आहेत. पायल यांचे पती अक्षय झांबरे यांना पोलिसांनी आधीच अटक केली असून, अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्यांच्या आई-वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. पायल यांच्या मृत्यूनंतर मंगल आणि अरविंद झांबरे रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून सोडल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून रीतसर अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली आहे.या प्रकरणातील छळाचे आरोप आणि पायल यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीचा सखोल तपास पोलिस करत आहेत.
Source link
पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक:पती अक्षय आधीच पोलिस कोठडीत; हुंडा, पैसे अन् सोन्यासाठी छळाचा आरोप