Headlines

बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?:व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची




काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर खासदार श्यामकुमार बर्वे आणि स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर यांनी समोर येत सर्व गैरसमज आणि आरोपांचे खंडन केले आहे. “धानोरकर ताई आमच्या सख्ख्या छोट्या बहिणीसारख्या आहेत, बसमध्ये कौटुंबिक थट्टा-मस्करी सुरू होती; आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी विरोधकांनी फेक ईमेल तयार करून हा खोडसाळ कट रचला आहे,” असा थेट पलटवार बर्वे यांनी केला आहे. बसमध्ये नेमकं काय घडलं होतं? धानोरकरांचा खुलासा व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांसमोर घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला. बसमध्ये कौटुंबिक विषयांवर गप्पा सुरू होत्या. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “हा आता 25 व्या वर्षात गेला आहे, याचे वय 30 झाल्यानंतर आम्ही लग्न करू आणि तुम्हालाही निमंत्रण देऊ. तेवढ्यात श्यामभाऊ बाजूने आले आणि म्हणाले, ‘माझा मुलगा आता 22-23 वर्षांचा झाला आहे आणि तुम्ही म्हणताय की हा 30 नंतर लग्न करणार?’ या थट्टेतून श्यामभाऊंनी हसतमुखाने माझ्या गालावर हलकासा हात लावला आणि वर्षाताईंकडेही तसेच केले. आम्ही सर्वजण त्यांच्या बहिणीसारख्या आहोत आणि नेहमी एकत्र असतो.” आंदोलन बदनाम करण्याचा फेक नॅरेटिव्ह- बर्वे व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ रॅलीदरम्यान आम्ही सर्व खासदार सलग 4 ते 5 तास बसमध्ये एकत्र होतो. घोषणाबाजी सुरू असताना मध्येच गप्पा आणि थट्टा-मस्करी चालते. शेजारी वर्षाताई गायकवाड, प्रतिभा धानोरकर ताई, मागे प्रशांत पडोळे आणि इतर सहकारी बसलेले होते. एक महिला असली तरी त्या आमच्या कुटुंबातील छोट्या बहिणीसारख्या आहेत. अनोळखी महिलेशी कोणी असे वागेल का?” व्हिडिओ क्रॉप करून षडयंत्र “तो मूळ व्हिडीओ आधीपासूनच आमच्या सोशल मीडिया हँडलवर, वर्षाताईंच्या आणि धानोरकर ताईंच्या अधिकृत अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. जर त्यामध्ये काही गैर असते तर तो आम्ही स्वतः का टाकला असता? विरोधकांनी केवळ तेवढाच भाग क्रॉप करून गैरसमज पसरवला आहे.” फेक ईमेल आयडीवरून पक्षाला तक्रार “वरिष्ठ नेत्यांकडे ज्या नावाने तक्रार पाठवली आहे, तो ईमेल आयडी पूर्णपणे बोगस आहे. नागपूर शहर काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांशी माझे बोलणे झाले असून त्यांनी स्पष्ट केले की हा काँग्रेसचा अधिकृत ईमेल नाही. आमची आणि एका महिला खासदाराची नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात मी स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून सायबर चौकशीची मागणी करणार आहे.” दिल्ली दरबारी तक्रारीनंतर प्रदेश काँग्रेसकडूनही स्पष्टीकरण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि दिल्लीत हायकमांडकडे ईमेल गेल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही यावर भूमिका मांडली आहे. “भाजपकडे आमच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, त्यामुळे अशा प्रकारे कौटुंबिक संवादाचे विकृतीकरण करून नॅरेटिव्ह सेट केला जात आहे,” असे बर्वे म्हणाले. आंदोलनाची धग कमी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदार रात्रंदिवस रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. या लढ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा बनाव रचला गेल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका… भाजप आमदार चित्रा वाघ यांनी व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, लोकशाही बचाओ’चा ढोंग करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा फाटलाय! स्व. बाळू धानोरकरांच्या निधनानंतर खंबीरपणे लोकसभेत महिलांचं नेतृत्व करणाऱ्या खा. प्रतिभा धानोरकर यांचा काँग्रेस रॅलीत मस्करीच्या नावाखाली झालेला अपमान अतिशय चीड आणणारा आहे. जंतरमंतरवर महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या प्रियंका गांधी आज पक्षातल्याच महिला खासदाराच्या अपमानावर गप्प का? ‘लडकी हू, लड सकती हू’चे नारे कुठे गेले? माध्यमांनी व्हिडीओ दाखवून खच्चीकरण करू नये; पण राहुल व प्रियंका गांधींनी या विकृतीवर तातडीने कारवाई करावी! —————————————————————— हेही वाचा…
कोल्हापुरात स्वाभिमानीचा एल्गार: 21 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, राजू शेट्टींचा इशारा, म्हणाले- तोडगा निघाला नाही तर दूध-भाजीपालाही मुंबईला जाऊ देणार नाही उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *