Headlines

चार राज्यांत तपास करून घरफोडीतील दोघांना अटक:गाझियाबादमधून रजिया सुलतान टोळीतील आरोपी पकडले; सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त




दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे तपास करून विश्रामबाग पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना गाझियाबाद येथून अटक केली. हे दोघे रजिया सुलतान टोळीतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हबीब हफीज सैफी आणि अकबर उर्फ फिरोज सुलतान सैफी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार घरात नसताना अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून दागिने चोरल्याची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके यांना दिले. त्यानंतर पथकाने तपासाचे नियोजन केले. पोलिस अंमलदार अर्जुन थोरात यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून संशयितांची छायाचित्रे एकत्रित केली. तपास सुरू असताना पोलिस हवालदार नितीन मुंडे आणि पोलिस अंमलदार अनिस शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उमेश कारके यांच्या नेतृत्वाखाली नितीन मुंडे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख आणि अर्जुन थोरात यांचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले. पथकाने आठवडाभर चारही राज्यातील विविध ठिकाणी शोध घेतला. स्थानिक मदत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून दोन्ही आरोपींना गाझियाबाद येथून पकडण्यात आले. पोलिस कोठडीत त्यांच्याकडे तपास केला असता ते रजिया सुलतान टोळीतील असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे , पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *