![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आणि ठणठणीत असून, त्यांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार हे त्यांच्या मूळ गावी, बारामतीला न जाता थेट मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. प्रवासात त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना अचानक कफ आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करता, त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करून विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या अचानक उद्भवलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांचा नियोजित दुष्काळी पाहणीचा दौरा आणि इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले होते. बारामतीऐवजी थेट मुंबईला रवाना दोन दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आज त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते बारामतीला आपल्या घरी जातील अशी सुरुवातीला चर्चा होती. मात्र, रुग्णालयातून बाहेर पडताच ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. डॉक्टरांचा सक्तीच्या आरामाचा सल्ला शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना पुढील किमान आठ दिवस सक्तीचा आणि पूर्णपणे आराम करण्याचा कडक सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहून मुंबईतच विश्रांती घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ——————- हेही वाचा.. कोल्हापुरात स्वाभिमानीचा एल्गार: 21 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, राजू शेट्टींचा इशारा, म्हणाले- तोडगा निघाला नाही तर दूध-भाजीपालाही मुंबईला जाऊ देणार नाही उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
शरद पवारांना दोन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज:प्रकृती स्थिर, दुष्काळी दौरा रद्द केल्यानंतर कफ आणि थकव्यामुळे दाखल केले होते