Headlines

मनसेकडून यंदाचा दीपोत्सव रद्द, साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन:राज ठाकरे म्हणाले- फटाके, रोषणाईला आवर घाला




मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा होणारा ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ यंदा रद्द करण्यात आला आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच, राज्यातील नागरिकांनीही यंदा फटाके आणि रोषणाईला आवर घालून साधेपणाने दिवाळी साजरी करावी, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ‘दुष्काळात उत्सव साजरा करणे मनाला पटत नाही’ राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, “शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी मोठ्या उत्साहात रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करत आपण दीपोत्सव साजरा करतो. हा दीपोत्सव पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. मात्र, यंदा आपण हा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेला आणि येऊ घातलेला भयानक दुष्काळ. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा उत्सव साजरा करणे मला काही पटले नाही.” ‘आपल्या ग्रामीण बांधवांना, त्यांच्या कच्च्या-बच्च्यांना काय वाटेल?’ ग्रामीण भागातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आज एका विचित्र अवस्थेतून जातोय. ग्रामीण भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आपण जर उत्साहात दिवाळी साजरी केली, तर आपल्या ग्रामीण भागातील बांधवांना, भगिनींना आणि त्यांच्या कच्च्या-बच्च्यांना काय वाटेल? याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे.” सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केले आहे की हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक असेल. पण हे जाहीर करूनही बहुधा सत्ताधारी पक्षातल्या लोकांना ते समजले नाही, म्हणूनच ते गरबा खेळत बसले. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आपल्याला दिवाळी साजरी करताना या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘काळी दिवाळी नको, पण फटाके आणि रोषणाईला आवर घाला’ जनतेला आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, “येत्या काळात दुष्काळामुळे ग्रामीण भागातून तांड्यांचे तांडे शहरांकडे स्थलांतरित होतील. अशा परिस्थितीत आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणे मला पटत नाही आणि तुम्हालाही पटता कामा नये. आपल्याला ‘काळी दिवाळी’ साजरी करायची नाहीये, पण आपल्या उत्साहाला, फटाके फोडण्याला आणि रोषणाईला कुठेतरी आवर घालणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी कंदील लावावेत, फराळ वाटावा, पण रोषणाई आणि फटाक्यांना आवर घालावा, हीच माझी नम्र विनंती आहे. ——————- हेही वाचा.. कोल्हापुरात स्वाभिमानीचा एल्गार: 21 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, राजू शेट्टींचा इशारा, म्हणाले- तोडगा निघाला नाही तर दूध-भाजीपालाही मुंबईला जाऊ देणार नाही उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *