Headlines

गोकुळच्या नावाने गुजरातचा जप कशाला?:2019ला पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये; भाजपचा संजय राऊतांवर पलटवार




“2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी स्पष्ट बहुमत दिले होते. भाजपच्या नावावर, पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर मते मागून जिंकून आल्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केले. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा ज्यांनी महाराष्ट्रात सुरू केली, त्यांनी आज गोकुळ दूध संघावरून किंवा इतर मुद्द्यांवर भाजपवर बोट दाखवू नये. गोकुळचा आणि गुजरातचा सुतराम संबंध नसताना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ गुजरातचे भूत उभे करून जनतेची दिशाभूल करणे हाच उबाठा गटाचा एकमेव धंदा उरला आहे,” असा थेट आणि अत्यंत जळजळीत प्रहार भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. 4 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानांचा अक्षरशः पंचनामा केला. शेतकऱ्यांना दिलेली 5,000 रुपयांची मदत, दिया मिर्झा वाद, कायदा-सुव्यवस्था आणि उबाठा गटाच्या राजकीय अस्तित्वावरून त्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5,000 रुपये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासात आजवर कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना एवढी तातडीची अग्रीम (अ‍ॅडव्हान्स) मदत दिली नव्हती. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील तब्बल 1.5 कोटी (दीड कोटी) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी 5,000 रुपये जमा केले जात आहेत.” ही केवळ प्राथमिक मदत “दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून ही 5,000 रुपयांची प्राथमिक मदत आहे, ही अंतिम मदत नाही. शेतांचे रीतसर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीनुसार संपूर्ण भरपाई दिली जाईल. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णयही घेतला आहे.” मविआच्या काळातील पोकळ आश्वासने “महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25,000 ते 50,000 रुपयांच्या मदतीची वल्गना करत होते; प्रत्यक्षात सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या हातावर साधी फुटकी कवडीही टेकवली नाही. आज जनतेनेच तुम्हाला नाकारून रस्त्यावर आणले असून, रस्त्यावर तांडव करण्यापलीकडे तुमची कोणतीही लायकी उरलेली नाही.” दिवाळी-होळीलाच प्रदूषण आठवते? मुंबई महापालिकेच्या दिया मिर्झा व्हिडीओ वादावरून संजय राऊतांच्या भूमिकेवर निशाणा साधताना बन यांनी सवाल उपस्थित केले. “संजय राऊत यांना केवळ हिरवी मते लाटायची असल्याने ते दिया मिर्झा, खान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात मग्न आहेत. हिंदू सणांना गालबोट लावण्यासाठीच हा सिलेक्टिव्ह अजेंडा राबवला जातो.” हिंदू सणांवरच आक्षेप का? “होळी आली की इको-फ्रेंडली होळी साजरी करा, दिवाळी आली की फटाकेमुक्त दिवाळी करा, असे सल्ले देणाऱ्यांची दातखिळी बकरी ईदच्या वेळी का बसते? जर स्वतःला इतकेच पर्यावरणवादी समजता, तर बकरी ईदच्या वेळी ‘इको-फ्रेंडली बकरी ईद साजरी करा आणि पिठाची बकरी कापा’ असा व्हिडीओ जारी करण्याचे धाडस संजय राऊतांनी करून दाखवावे. देशातला हिंदू जागा झाला असून तुमचे हे दुटप्पी ढोंग आता चालणार नाही.” अमिताभ बच्चन यांनी सुरक्षा घेतली तर तुमच्या पोटात का दुखते? बॉलिवूड कलाकारांची सुरक्षा आणि मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारची पाठराखण करताना ते म्हणाले, “अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक करून दाखवले. सदीचे महानायक अमिताभ बच्चन हे देशाचा मान आहेत. त्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून जर बुलेटप्रूफ काचेची व्यवस्था करण्यात आली, तर संजय राऊतांच्या पोटात का दुखत आहे?” स्वतः 4 अंगरक्षक घेऊन फिरता “संजय राऊत स्वतः रस्त्यावर फिरताना आजूबाजूला 4 अंगरक्षक घेऊन फिरतात; मग अमिताभ बच्चन यांनी खबरदारी घेतली तर त्याला पळपुटेपणा कसा म्हणता? देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अत्यंत सक्षम असून 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकांत जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.” महाविकास आघाडीच्या काळातील पापांची आठवण “गृहमंत्री असताना 100 कोटींची वसुली करणारे, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके पेरणाऱ्या सचिन वाझेचे लादेनसारखे समर्थन करणारे आणि पालघरमधील साधूंची निर्घृण हत्या मूकपणे पाहणारे लोक आज आम्हाला कायदा शिकवत आहेत, हे हास्यास्पद आहे.” उबाठा पक्षाचा तर ‘बचत गट’ झालाय ठाकरे गटाच्या राजकीय पडझडीचा पाढा वाचताना मुख्य प्रवक्त्यांनी जहरी टीका केली. “अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा खरा पक्ष आहे, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा केवळ ‘बचत गट’ शिल्लक राहिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत 90 जागा लढवून तुम्हाला केवळ 15 जागांवर विजय मिळाला, तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनतेने तुमच्या हातात भोपळा आणि अंडा दिला आहे.” 3 खासदार रिक्षामध्ये बसतील “सध्या तुमच्या पक्षामध्ये एका रिक्षात मावतील एवढेच ३ खासदार उरले आहेत—एक संजय राऊत, दुसरे अनिल देसाई आणि तिसरे अरविंद सावंत! आधी रिक्षातले हे ३ खासदार तरी टिकवून दाखवा, कारण आगामी काळात ही रिक्षाही हातातून जाऊन तुम्हाला टू-व्हीलरवर फिरावे लागेल अशी अवस्था झाली आहे.” चार वेगवेगळ्या रूपांचे संजय राऊत “शिंदे यांच्या पक्षात किती शिंदे आहेत हे शोधण्यापेक्षा संजय राऊतांनी स्वतःच्या ४ रूपांचा शोध घ्यावा. एक संजय राऊत उद्धव ठाकरेंची गुलामी करतात, दुसरे संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करतात, तिसरे संजय राऊत शरद पवारांचे लांगूलचालन करतात, तर चौथे संजय राऊत हे चीनची एजंटगिरी करतात! रोज आपली निष्ठा बदलणाऱ्या अशा एजंटांनी इतरांना नैतिकता शिकवण्याचे धंदे बंद करावेत,” असा घणाघात नवनाथ बन यांनी शेवटी केला. —————————————————————— हेही वाचा… मनसेकडून यंदाचा दीपोत्सव रद्द, साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन: राज ठाकरे म्हणाले- फटाके, रोषणाईला आवर घाला मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा होणारा ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ यंदा रद्द करण्यात आला आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच, राज्यातील नागरिकांनीही यंदा फटाके आणि रोषणाईला आवर घालून साधेपणाने दिवाळी साजरी करावी, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *