![]()
काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील एका आंदोलनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यातील बसमधील संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार बर्वे हे धानोरकर यांच्या गालावर हलकी चापट मारताना दिसत आहेत. यावरून आता महाराष्ट्रात मोठे राजकारण तापले असून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि विशेषतः प्रियंका गांधी यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर घणाघात या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करत चित्रा वाघ म्हणाल्या, “लोकशाही बचावच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निर्दयी चेहरा आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. एक महिला लोकप्रतिनिधीशी असे कसे कोण वागू शकते? हे पाहून चीड येत नाही, तर मनाला वेदना होत आहेत. स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या जाण्याने पाठीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, स्वतःचे अश्रू पुसून जी स्त्री अत्यंत खंबीरपणे उभी राहिली आणि आज लोकसभेमध्ये महिलांचा आवाज बनते आहे, त्याच प्रतिभाताई धानोरकरांना त्यांच्याच पक्षात कशा प्रकारची वागणूक दिली जाते? मस्करीच्या नावाखाली हा असला अपमान?” त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला आणि म्हटले, “आधी चंद्रपुरात वडेट्टीवारांकडून सातत्याने होणारा त्रास आणि आता हा प्रकार. काँग्रेसमध्ये एका संघर्षशील महिला खासदाराला सन्मानाने जगूही दिले जात नाहीये का?” प्रियंका गांधींना थेट सवाल प्रियंका गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना वाघ म्हणाल्या, “जंतरमंतरवर जाऊन महिला सुरक्षेच्या नावाखाली कॅमेऱ्यासमोर डोळ्यात पाणी आणणाऱ्या प्रियंका गांधी आज कुठे आहेत? ‘लडकी हूँ लड सकती हूँ’च्या गप्पा मारणाऱ्या प्रियंकाजी, आज तुमच्याच पक्षातल्या एका दुःखी आणि संघर्ष करणाऱ्या महिला खासदाराचे पंख छाटले जात आहेत, मग अशा वेळेला तुमचे ओठ का शिवलेत? काँग्रेस नेत्यांना ना संवेदना उरलीये ना शिस्त. राहुल आणि प्रियंका गांधींनी तात्काळ संबंधितांवर कडक कारवाई करावी.” तसेच, हा व्हिडिओ वारंवार दाखवून त्या खंबीर महिला खासदाराचे खच्चीकरण करू नका, अशी हात जोडून विनंतीही त्यांनी माध्यमांना केली. नेमके प्रकरण काय आहे? काँग्रेस पक्षाच्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकी चापट मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्षांकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. खासदार बर्वे आणि धानोरकर यांचा खुलासा या प्रकरणावर खासदार श्यामकुमार बर्वे आणि स्वतः प्रतिभा धानोरकर यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, “बसमध्ये कौटुंबिक विषयांवर गप्पा सुरू होत्या. लग्नाच्या विषयावरून थट्टा सुरू असताना श्यामभाऊंनी हसतमुखाने माझ्या गालावर हलकासा हात लावला. आम्ही सर्वजण त्यांच्या बहिणीसारख्या आहोत आणि नेहमी एकत्र असतो.” तर, खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले की, “धानोरकर ताई आमच्या छोट्या बहिणीसारख्या आहेत. घोषणाबाजी सुरू असताना मध्येच गप्पा आणि थट्टा-मस्करी चालते. अनोळखी महिलेशी कोणी असे वागेल का? तो मूळ व्हिडिओ आम्ही स्वतः आमच्या सोशल मीडियावर टाकला होता. विरोधकांनी केवळ तेवढाच भाग क्रॉप करून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा कट रचला आहे.” —————— हेही वाचा.. बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?:व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची
काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link