![]()
चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात 30 जून 2026 रोजी एका स्कूल बसवर पिंपळाचे महाकाय झाड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत बसमधील 11 वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला, तर इतर काही जण जखमी झाले होते. या घटनेच्या सविस्तर चौकशीसाठी मुंबई महापालिकेने एक विशेष समिती स्थापन केली होती. या दुर्घटनेप्रकरणी माजी कुलगुरू प्रा. संजय व्ही. देशमुख यांनी चार खंडांचा सविस्तर चौकशी अहवाल पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला आहे. अतिवृष्टी आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे झाड कोसळल्याचे सांगत, या घटनेमागे केवळ एकच कारण निश्चित करता येत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच, या घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हणजेच ‘Act of God’ ठरवण्यात आले असून, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांमुळे बसचा वेग कमी झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना क्लीन चिट या चौकशी अहवालात पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र, पर्जन्य जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामावर ठपका ठेवत त्याला 5 लाख रुपये आणि सल्लागार संस्थेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस समितीने केली आहे. वृक्ष व्यवस्थापनात बदलांची गरज झाडांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने वृक्ष व्यवस्थापनात व्यापक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच झाडांच्या मुळांजवळ होणारे खोदकाम, रस्ते बांधकाम, भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम आणि हवामानाचा झाडांवर होणारा परिणाम यांचा नियमित आणि सखोल अभ्यास करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत. कुटुंबीयांकडून कारवाईची मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि उद्यान विभागाला अहवालातून देण्यात आलेल्या क्लीन चिटमुळे विहानच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुलाला गमावल्याच्या दुःखात असलेल्या श्रीवास्तव दाम्पत्याने या चौकशी अहवालावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Source link
चेंबूर स्कूल बस दुर्घटना:अहवालात 'Act Of God'चा निष्कर्ष; 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी समितीचा अहवाल सादर