Headlines

'गोकुळ'वर शासननियुक्त 4 सदस्यांचा शासननिर्णय!:सतेज पाटील म्हणाले- साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल पायदळी तुडवला; 2029ला हे सगळं लक्षात ठेवू




कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठे वळण लागले आहे. गोकुळमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला बहुमत मिळालेले असतानाही, महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह थेट 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीतील संख्याबळ बदलून महायुतीचा अध्यक्ष बसवण्याची खेळी रचली गेल्याचा आरोप करत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “हा लोकशाहीचा उघड गळा घोटण्याचा प्रकार आहे. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला जनाधार जर सत्ताधारी नाकारणार असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही; न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावर उतरायलाही आमची पूर्ण तयारी आहे,” असा थेट इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. जिंकूनही संख्याबळाचा पेच; मंत्रिमंडळाच्या निर्णयाने समीकरणात उलथापालथ नुकत्याच पार पडलेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. एकूण 25 जागांपैकी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या, तर महायुती पुरस्कृत आघाडीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. 14 संचालकांच्या कोरमचा अडसर स्पष्ट बहुमत सतेज पाटील यांच्याकडे असले, तरी अध्यक्ष निवडीच्या अधिकृत सभेसाठी किमान 14 संचालकांच्या उपस्थितीचा कोरम (गणसंख्या) आवश्यक असतो. महायुतीचे 12 संचालक बैठकीला गैरहजर राहिल्याने अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला होता. मंत्रिमंडळाचा ‘तो’ निर्णय अध्यक्षपदाची निवडणूक प्रलंबित असतानाच मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3,000 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये 4 तज्ज्ञ संचालक मतदानाच्या अधिकारासह नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे गोकुळमध्ये बाहेरून 4 सदस्य नियुक्त करून महायुती आपला अध्यक्ष बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. 6 नगरसेवक शिंदे गट आणि मुश्रीफांनी द्यावेत, आम्ही महापौर करतो, सतेज पाटलांचा टोला महायुतीने ‘कोरम पूर्ण करण्यासाठी दोन जागांचा पाठिंबा द्या’ असे आवाहन पत्रकाद्वारे केल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत जोरदार समाचार घेतला. “आम्हाला बहुमत असताना आम्ही आमचा एक संचालक तिकडे देऊन तुमचा चेअरमन करायचा, ही महायुतीची अत्यंत हास्यास्पद मागणी आहे. तसे असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेत आमचे 35 नगरसेवक आहेत, केवळ 5 ते 6 नगरसेवक कमी पडत आहेत; मग शिंदे गट आणि हसन मुश्रीफ यांनी ते 6 नगरसेवक आम्हाला द्यावेत, आम्ही आमचा महापौर करतो.” विरोधी पक्षात बसण्याचा कौल स्वीकारा “मतदारांनी जर तुम्हाला 12 जागा देऊन विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, तर तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. पराभव पचवता येत नसल्यानेच हा सगळा पोरखेळ सुरू आहे.” 2029ला सत्तेची चक्रे फिरतील तेव्हा लक्षात ठेवू! सरकारच्या या अध्यादेशावर आणि धोरणावर प्रहार करताना सतेज पाटील म्हणाले, “लोकशाहीत मिळालेला जनतेचा मॅन्डेट बाजूला सारून मागील दाराने संचालक घुसवणे पूर्णपणे चुकीचे आहे. असा प्रयोग यापूर्वी गुजरातमध्ये आणि पुणे महापालिकेत झाला होता. हा चुकीचा निर्णय महाराष्ट्रात लागू करू नये, म्हणून मी काल रात्रीच मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली होती.” 2029ला हिशोब चुकवू “सत्तेची सूत्रे कायम एकाच्याच हातात राहत नाहीत. 2029ला महाराष्ट्रात सत्तेची चक्रे बदलणार आहेत आणि त्यावेळी आम्ही या सगळ्या दडपशाहीची आणि सूडाच्या राजकारणाची नक्की आठवण ठेवू,” असा घणाघाती इशारा त्यांनी दिला. अटलजींच्या एका मताचा दाखला “सिम्पल मेजॉरिटी इज मेजॉरिटी! माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार संसदेत अवघ्या एका मताने पडले होते. त्या एका मताची किंमत लोकशाहीत असते. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी आम्हाला 13 संचालक निवडून दिले आहेत, त्यामुळे गोकुळवर सतेज पाटलांची नाही तर शेतकऱ्यांची सत्ता आहे.” 10 तारखेला शशिकांत पाटील चुयेकरच गोकुळचे चेअरमन होणार! उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी आपला अध्यक्ष होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. “उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले आहेत की 25 निवडून आलेल्या संचालकांना बैठकीची नोटीस पाठवून त्यांच्यातूनच चेअरमनची निवड केली जावी. त्यामुळे येत्या १० तारखेला होणाऱ्या बैठकीत सर्व संचालक उपस्थित राहतील आणि आमचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर हेच गोकुळचे नवीन चेअरमन होतील, याची मला 100% खात्री आहे.” संचालक सहलीवर का? “महायुतीचे संचालक मुंबईहून अलिबागला गेलेत की जयपूरला, हे मला ठाऊक नाही. पण जनतेचा कौल नाकारून हा खेळखंडोबा नेमका कोणासाठी आणि कशासाठी चालवला आहे, याचा जाब सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावाच लागेल.” शेतकऱ्यांच्या 5,000 रुपयांच्या दुष्काळी मदतीवरही भाष्य करताना त्यांनी, “शेतकऱ्यांना खासगीत विचारून बघा, 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होते ते त्यांचे कार्यकर्तेच त्यांना सांगतील,” असा चिमटा सत्ताधाऱ्यांना काढला. ————————————————————- हेही वाचा… बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?:व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *