![]()
राज्य शासनातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेली 5 हजार रुपयांची अग्रिम मदत आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, येत्या दोन दिवसांत 95 टक्के लाभार्थ्यांपर्यंत ती पोहोचेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’अंतर्गत आज आणखी 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या (ज्यात सर्वाधिक 2.76 लाख शेतकरी मराठवाड्यातील आहेत) खात्यात 4,764 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 21 लाख शेतकऱ्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवळीपूर्वी अग्रिम मदत म्हणून 5 हजार रुपये देण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर त्यानुसार आत्तापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचतील. 5 टक्के थोडे मागे पुढे होतात कारण खात्यांमध्ये काही अडचणी असतात, पण आत्तापर्यंत जसं मी सांगितलं की 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील. 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी आहे, या योजनेच्या अंतर्गत आज पुन्हा 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4 हजार 764 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत. त्यामुळे आता आणि हे जे आज आपण जमा केले आहेत, यापैकी सर्वाधिक शेतकरी हे मराठवाड्यातले आहेत. आज जवळपास मराठवाड्यातल्या 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यात आलेले आहेत. आता जर आपण एकूण बघितलं तर जवळपास 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे आपण त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि जवळपास 19 हजार कोटी रुपये हे आपण कर्जमाफीच्या करता त्या ठिकाणी जमा केलेले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी तसेच अजूनही याद्यांचं प्रमाणीकरण चाललंय, जसं जसं प्रमाणीकरण होत राहील तशा तशा त्या त्या खात्यांमध्ये हे पैसे भरण्याची कारवाई आपली सुरू राहील. त्यामुळे एकूणच हे जे काही महायुतीचं सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा आमचा चाललेला आहे आणि त्याचे प्रत्यक्ष पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करा देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांना शेतकऱ्यांसोबत जाऊन दिवाळी साजरी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, असं आहे की आम्ही सगळ्यांनी मिळूनच हा निर्णय घेतलेला आहे, हे माझे आदेश नाहीयेत. सगळ्या मंत्र्यांशी चर्चा करून सगळ्यांना असं वाटतंय की आपण दिवाळी ही शेतकऱ्यांसोबत साजरी केली पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल की दिवाळीच्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी जायचं, शेतकऱ्यांकडे जायचं, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायची असा आम्ही प्रयत्न करू. मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू होते मराठवाड्यातील पाणी टंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचा प्रयत्न असा आहे की हे काम लवकरात लवकर संपवून त्या माध्यमातून पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हेही मला सांगितलं पाहिजे की इतके वर्ष मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चाललं होतं, पण महायुतीच्या सरकारनेच मराठवाड्याच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी हे मराठवाड्याला दिलं. त्याचं काम आता पूर्णत्वापर्यंत आम्ही नेलं, लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर ते पाणी मिळेल आणि त्याचा सर्वाधिक फायदा अर्थातच धाराशिव जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्याला होणार आहे. रेजीम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो विरोधकांकडून भाजपच्या मोर्चांवर टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की आमचे मोर्चे कशाकरता आहेत हे जर समजून घेतलं तर कदाचित अशा पद्धतीने ते बोलणार नाहीत. हे मोर्चे अराजकतेच्या विरोधातले मोर्चे आहेत, संविधान वाचवण्याकरता हे मोर्चे आहेत. ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आघाडी या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन (रेजीम चेंज) करण्याचा प्रयत्न करतेय आणि रेजीम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो. त्यामुळे रेजीम चेंज करण्याचा हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्याकरता केवळ तेच रस्त्यावर येऊ शकत नाहीत, आम्हीही रस्त्यावर येऊन याचा मुकाबला करू शकतो. ते जेवढे लोक घेऊन रस्त्यावर येतात त्यापेक्षा जास्त लोकांचं समर्थन हे भारतीय संविधानाला आहे, भारतीय लोकशाहीला आहे आणि अराजकतेच्या विरोधात आहे, म्हणून आमचे हे मोर्चे चाललेत, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले फडणवीस? कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ऊस दर वाढीसंदर्भात आंदोलन सुरू आहे. यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेवटी माझा सवाल आहे की या आंदोलनाचं नुकसान कोणाला होतंय? ते केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना होतंय. आणि म्हणून माझी अपील आहे, राज्य सरकार चर्चा करतेय, शेवटी प्रश्न कारखाने आणि शेतकरी यांच्यामधला आहे. कारण एफआरपी देणं बंधनकारक आहे, ती शासनाने घोषित केली आहे आणि ती दरवर्षी आपण देतो. एफआरपीपेक्षा जास्त ही किंमत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. शेतकरी आणि कारखानदार या दोघांमध्ये सातत्याने या संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि राज्य सरकारची भूमिका मध्यस्थाची आहे. आम्ही प्रयत्न करतोय की यातून मार्ग निघाला पाहिजे आणि शांतपणे हे आंदोलन संपलं पाहिजे. आता हसन मुश्रीफ आमचे जे मंत्री आहेत यांनाही आम्ही असं सांगितलेलं आहे की त्यांनी मध्यस्थीची बोलणी करावीत.
Source link
दिवाळीपूर्वी बळीराजाला दुहेरी दिलासा:दुष्काळी मदतीसह कर्जमाफीचे पैसे थेट खात्यात, CM देवेंद्र फडणवीसांची माहिती