![]()
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराला कारची धडक देत आत घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका पोलिस शिपायावर झाला आहे. अमोल भिसे असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. छावणी परिसरातील आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर हा प्रकार घडला. भिसे याने कार मुख्य प्रवेशद्वारावर नेऊन धडक दिली आणि आत जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. त्यावेळी प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. बदलीवरून नाराजी? भिसे हा पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. त्याला शहरातील एका विशिष्ट पोलिस ठाण्यात बदली हवी होती. मात्र, अपेक्षित ठिकाणी बदली न मिळाल्याने तो नाराज होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमागील नेमक्या कारणाची तपासातून स्पष्टता होणार आहे.घटनेच्या वेळी संबंधित कर्मचारी कथितरीत्या मद्याच्या प्रभावाखाली होता, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्याला 2025 मध्ये निलंबित करण्यात आले होते आणि 2026 मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, घटनेची परिस्थिती आणि त्यामागील कारण तपासले जात आहे.
Source link
पोलिस शिपायाने आयुक्तांच्या बंगल्याच्या गेटला कार धडकवली:पुण्यातील घटनेनंतर अमोल भिसे ताब्यात; कोणीही जखमी नाही